ऑलिम्पिकमध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकण्याचे ध्येय; आंतरराष्ट्रीय सायकलपटूची यशोगाथा
By अरुण वाघमोडे | Published: February 15, 2024 05:46 PM2024-02-15T17:46:42+5:302024-02-15T17:47:53+5:30
अहमदनगर : जीवनात यशस्वी होण्यासाठी एकाच खेळावर एकाग्रता करून रोमांचकारी व अवघड प्रकार असलेल्या माउंट बायकिंग सायकलिंग प्रकारात करिअर ...
अहमदनगर: जीवनात यशस्वी होण्यासाठी एकाच खेळावर एकाग्रता करून रोमांचकारी व अवघड प्रकार असलेल्या माउंट बायकिंग सायकलिंग प्रकारात करिअर करण्याचा निर्णय घेतला. वडिलांनी मोठी साथ दिली. माउंट बायकिंग व रोड सायकलिंग प्रकारात राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावर यश मिळवल्यावर आता आशियाई स्पर्धा पूर्ण करून त्यात रौप्यपदक पटकावले आहे. आता ऑलिम्पिक हेच उद्दिष्ट असून देशासाठी सुवर्णपदक जिंकण्याची इच्छा आहे. अनेक संकटे व अडचणींवर एकटीने मात करत इथपर्यंत पोहचले आहे. अशा शब्दात आंतरराष्ट्रीय सायकलपटू प्रणीता सोमण हिने विद्यार्थ्यांपुढे आपली यशोगाथा मांडली.
नगरमधील पेमराज सारडा महाविद्यालयाची विद्यार्थिनी आंतरराष्ट्रीय सायकलपटू व शिवछत्रपती पुरस्कार विजेती प्रणीता सोमण हिला नुकताच पुणे विद्यापीठाचा प्रतिष्ठेचा युवा गौरव पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सारडा महाविद्यालयात तिचा गुरुवारी सत्कार करण्यात आला. यावेळी तिने विद्यार्थ्यांशी संवाद साधला. हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक व कार्याध्यक्ष अनंत फडणीस यांच्या हस्ते मानचिन्ह देवून प्रणीता हिला सन्मानित करण्यात आले. प्रणीता पुढे म्हणाली, सारडा महाविद्यालयात शिकत असताना मला खूप मोठे मार्गदर्शन, प्रोत्साहन व प्रशिक्षण मिळाले. हिंद सेवा मंडळ, पेमराज सारडा महाविद्यालय तसेच प्राचार्य, आधारस्तंभ क्रीडा प्रशिक्षक संजय धोपावकर व संजय साठे, सर्व विषयांचे प्राध्यापकांनीही वेळोवेळी भरपूर सहकार्य करून प्रोत्साहन दिल्याबद्दल आभार मानते.