अजित पवारांच्या आजोळात आनंदोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 06:00 PM2019-11-23T18:00:37+5:302019-11-23T18:02:29+5:30
उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतलेले अजित पवार यांचा जन्मगावी देवळाली प्रवरा येथे मात्र आनंद व्यक्त करण्यात आला.
राहुरी : आमदार प्राजक्त तनपुरे हे शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँगे्रसबरोबर असल्याचे स्पष्ट झाले आहे. उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतलेले अजित पवार यांचा जन्मगावी देवळाली प्रवरा येथे मात्र आनंद व्यक्त करण्यात आला.
अजित पवार यांचा वैयक्तिक निर्णय असून राष्ट्रवादीशी संबंध नसल्याचे उघड झाल्यानंतर चर्चेला उधान आले. राहुरीत मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार विराजमान झाल्यानंतर भाजप कार्यकर्ते प्रकाश पारख यांच्यासह कार्यकर्त्यांनी जल्लोश साजरा केला.
अजित पवार यांचे देवळाली प्रवरा हे आजोळ आहे. स्व. सर्जेराव कदम व स्व. आण्णासाहेब कदम हे त्यांचे मामा होते. आजोळी पवार यांचा जन्म झाला होता. पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पवार यांनी देवळाली प्रवरा येथे मामाच्या गावी येऊन विहीर व मळ््याची पाहणी केली होती. त्यामुळे पवार उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त केला.
आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राष्ट्रवादीबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनीही शरद पवार यांच्या विचाराबरोबर जमवून घेतले. त्यामुळे राहुरी मतदारसंघात तनपुरे यांना टिकेला सामोरे जावे लागले नाही़. तीन दिवसांपूर्वी आमदार तनपुरे व पार्थ पवार यांनी राहुरी ते शनिशिंगणापूर प्रवासात गुप्तगू केले होते.