अजितदादा आमदाराला म्हणाले, ‘काळजी घे रे बाबा’ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:21 AM2021-05-12T04:21:21+5:302021-05-12T04:21:21+5:30
टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : कोरोना रुग्णांची सेवा करतोय, यात आनंद आहे. मात्र स्वत:चेही आरोग्य महत्त्वाचे आहे. मी सकाळपासून दहा ...
टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : कोरोना रुग्णांची सेवा करतोय, यात आनंद आहे. मात्र स्वत:चेही आरोग्य महत्त्वाचे आहे. मी सकाळपासून दहा वेळा तुझा व्हिडिओ पाहिला. तू जनतेची काळजी करतो. मात्र, पाहिजे तेवढी स्वत:ची काळजी घेत नाहीस, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगर जिल्ह्यातील पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली.
लंके यांनी ‘शरद पवार आरोग्य मंदिर’ या नावाने अकराशे बेडचे कोविड सेंटर भाळवणी येथे उभारले आहे. या केंद्रास जनतेतून मोठी मदत मिळत असून, देश-परदेशातूनही देणगी येत आहे. या केंद्रात लंके स्वत: रुग्णांमध्ये फिरून त्यांची काळजी घेतात. रुग्णांचा आहार, औषधे यावर स्वत: लक्ष ठेवून आहेत. रात्री दीड-दोन वाजताही ते केंद्रात फेऱ्या मारतात. अनेक रुग्णांची ऑक्सिजन पातळी ते स्वत: तपासतात. बऱ्याचदा ते या केंद्रातच मुक्काम करतात. ‘लोकमत’ने या कोविड सेंटरमध्ये जात लंके यांची विशेष मुलाखत घेतली आहे.
या मुलाखतीनंतर राज्यभरातील नेते लंके यांच्याशी संपर्क करून त्यांचे कौतुक करत आहेत. मुलाखतीचा व्हिडिओ पाहून अजित पवारांनी स्वत: लंके यांना फोन केला व स्वत:ची काळजी घेण्याचा सल्ला दिला. ‘मी स्वत:ची काळजी घेतोय’ असे लंके म्हणताच पवार खास आपल्या स्टाइलमध्ये म्हणाले, ‘कशाचे काय मी सकाळपासून दहावेळा तुझा व्हिडिओ पाहिला आहे. तू हवी तेवढी काळजी घेत नाहीस. मास्क, हॅण्डग्लोव्हज वापरत जा’.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही मंगळवारी लंके यांना दूरध्वनी करून काळजी घेण्याचा सल्ला दिला. ‘तुम्ही चांगले काम करत आहात. मात्र, रुग्णांच्या संपर्कात जाऊ नका. कुणी विचारले तर मी सल्ला दिलाय म्हणून सांगा’ असे ते लंके यांना म्हणाले.
......
‘लोकमत’चा व्हिडिओ व्हायरल
कोविड सेंटरमध्ये काम करताना लंके हे स्वत: मास्कही लावायला विसरतात. ‘लोकमत’ने त्यांची या कोविड सेंटरमध्ये नुकतीच विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांना ‘मास्क’बाबत खास प्रश्न विचारण्यात आला होता. लंके यांच्या मुलाखतीचा हा व्हिडिओ ‘लोकमत’चा यू-ट्यूब चॅनल व सोशल मीडियावर गाजत आहे. अजित पवार यांनीही या व्हिडिओची दखल घेत लंके यांना आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.