अकोलेत गलोलीने मारली लांडोर; न्यायालयाने सुनावली ३ जानेवारीपर्यंत कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 03:23 PM2017-12-21T15:23:43+5:302017-12-21T15:24:26+5:30
गलोलीने लांडोर (मोर) ठार मारल्याप्रकरणी पिंपळगाव नाकविंदा येथील एकास बुधवारी वन विभागाच्या कर्मचा-यांनी अटक केली. त्यास ३ जानेवारी २०१८ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
अकोले : गलोलीने लांडोर (मोर) ठार मारल्याप्रकरणी पिंपळगाव नाकविंदा येथील एकास बुधवारी वन विभागाच्या कर्मचा-यांनी अटक केली. त्यास ३ जानेवारी २०१८ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
मंगळवारी १९ डिसेंबरला सकाळी तालुक्यातील आदिवासी क्षेत्रातील शेलविहिरे शिवारातील मालकी हक्काच्या सर्वे क्रमांक ११५ मध्ये अंदाजे एक ते दीड वर्षे वयाची लांडोर मृतावस्थेत आढळली. ग्रामस्थांनी ही माहिती वन खात्यास दिली. गावक-यांच्या माहितीच्या आधारे राजूर विभागाचे वनपरिक्षेत्रपाल दिलीप जाधव, वन परिमंडल अधिकारी मधुकर चव्हाण, वनरक्षक बहिरु बेणके, भास्कर मुठे, वन कर्मचारी विठ्ठल पारधी यांनी तपास केला. बुधवारी पिंपळगाव नाकविंदा येथील आरोपी वाळीबा संतू मेंगाळ यास याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरूद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या कलम ५१/१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास अकोले न्यायालयाने ३ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.