अकोलेत गड, धबधबे, गुहा आजही पर्यटकांचे आकर्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 05:08 PM2019-09-27T17:08:14+5:302019-09-27T17:08:19+5:30

अकोले तालुक्यातील शेकडो दुर्लक्षित धबधबे, गड, गुहा, जंगल, गडवाटांनी किमान दोन हजार वर्षांचा इतिहास जसाच्या तसा ठेवला आहे. गरज आहे हा अमूल्य ठेवा जगासमोर येण्याची, तसेच शासनाच्या पर्यटन विभागाने योग्य प्रसिद्धी देण्याची.

Akole fort, waterfalls and caves are still a tourist attraction | अकोलेत गड, धबधबे, गुहा आजही पर्यटकांचे आकर्षण

अकोलेत गड, धबधबे, गुहा आजही पर्यटकांचे आकर्षण

जागतिक पर्यटन दिन विशेष/ मच्छिंद्र देशमुख/  कोतूळ-अकोले तालुक्यातील निसर्ग, गड-किल्ले म्हणजे महाराष्ट्राच्या नैसर्गिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरांचा राजमार्ग. आजही अकोले तालुक्यातील शेकडो दुर्लक्षित धबधबे, गड, गुहा, जंगल, गडवाटांनी किमान दोन हजार वर्षांचा इतिहास जसाच्या तसा ठेवला आहे. गरज आहे हा अमूल्य ठेवा जगासमोर येण्याची, तसेच शासनाच्या पर्यटन विभागाने योग्य प्रसिद्धी देण्याची.
राज्यातील वन्यजीव व वनसंपदेसाठी हरिश्चंद्रगड व कळसूबाई अभयारण्य सर्वश्रुत आहे. कळसूबाई, भंडारदरा, रंधा ही पर्यटनस्थळे राज्यभर प्रसिद्ध झाली, ती भंडारदरा धरण व  इथल्या व्यावसायिकांनी केलेल्या जाहिरातीमुळे. तालुक्यातील मुळा नदीच्या उगमापर्यंत कोतूळ ते हरिश्चंद्रगडापर्यंत शेकडो धबधबे पर्यटकांना हाक देत आहेत. त्यात कोतूळ (पिसेवाडी) येथील कातरण्याचा तीनशे फुटांवरुन कोसळणारा धबधबा, तसेच मुकाईचा धबधबा, कोहणे परिसरातील बाळाईचा धबधबा, तर तळे, विहीर, कोथळे डोंगरावरून कोसळणारे शेकडो धबधबे पर्यटकांची वाट पाहत आहेत. 
तालुक्यात हरिश्चंद्रगड व कळसूबाईच्या कुशीत दोन हजार वर्षांचा मोठा इतिहास दडला आहे, तो म्हणजे तालुक्यातील अलंग, मलंग व कुलंग गड, तसेच करवली (सांधन दरी ) चेंढ्या, मेंढ्या व उंबरदरा या घाटवाटांमध्ये. सातवाहन काळातील जगातील पहिली मराठी सम्राज्ञी नागनिका हिने हे किल्ले व मार्ग बनवले. ती आंद्र (आंदर मावळ) येथील म्हणजे हल्लीचे जुन्नर येथील सम्राज्ञी होती. नाणे घाट व अकोले तालुक्यातील या मार्गांनी कलीयन (कल्याण), शुरपारक (नालासोपारा) या आंतरराष्ट्रीय बंदरांत मसाल्याचे पदार्थ, कलाकुसरीच्या वस्तुंची ने आण करण्यासाठी चेंड्या घाट (व्यापारी मार्ग) तयार केला. तर मेंढ्या (लष्करी मार्ग) होता. दोन्ही मार्ग नैसर्गिक आपत्तीने बंद झाल्यास उंबरदरा (बायपास) तयार केला. पुढे सातवाहन राजे सातकर्णी व शिवश्री यांनी हे मार्ग विकसित करून अखंड सत्ता ठेवली. आजही हे मार्ग सुस्थितीत आहेत. घाटनदेवीमार्गे मेढं (शहापूर) या ठिकाणी जायला स्थानिक आदिवासी आजही याच मार्गाने पायी जातात, तर ट्रेकर्सचे स्वप्न पूर्ण करणारे अलंग मलंग व कुलंग किल्ले कोकण व पश्चिम महाराष्ट्राचे निरीक्षक ठरले.
अकोले तालुक्यातील धारेरावचे अप्रतिम जंगल,  क्रांतिवीर राघोजी भांगरे यांची बाडगीची माची, शेणीतचे भुयार (स्थानिक लोक यास हिरण्यकश्यपूची राजधानी म्हणतात) अशी कितीतरी पर्यटनस्थळे प्रसिध्दीअभावी दुर्लक्षित आहेत. 
अकोले तालुक्यातील इतिहास, निसर्ग व अलंग, मलंग, कुलंग हे किल्ले राज्यातील ट्रेकर्सचे स्वप्न आहे. रस्ते, निवास अशा सुविधा मिळाल्या व या ठिकाणांची माहिती पर्यटन विभागाने चित्रफितीद्वारे प्रसिद्ध केल्यास येथील पर्यटन जगाच्या नकाशावर येईल, असे सातवाहन ट्रेकर्सचे  धनंजय गाडेकर यांनी सांगितले.      
                 अकोले तालुक्यातील बराच इतिहास व प्रेक्षणीय स्थळे प्रसिध्दीपासून दूर आहेत. लवकरच तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन, माहिती संकलित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, असे हरिश्चंद्रगडाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल आडे यांनी सांगितले. 
 

Web Title: Akole fort, waterfalls and caves are still a tourist attraction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.