अकोले महाविकास आघाडीने मारली बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:22 AM2021-01-19T04:22:47+5:302021-01-19T04:22:47+5:30
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव यांच्या आंबड गावातील ४० वर्षांच्या एकहाती सत्तेला सुरुंग लावत महाविकास आघाडीने सर्व जागा जिंकल्या. ...
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव यांच्या आंबड गावातील ४० वर्षांच्या एकहाती सत्तेला सुरुंग लावत महाविकास आघाडीने सर्व जागा जिंकल्या. महाविकास आघाडीने ३७ ग्रामपंचायतींवर झेंडा फडकविल्याचे आमदार डॉ.किरण लहामटे यांनी सांगितले. सेनेचे तालुकाप्रमुख मच्छीन्द्र धुमाळ यांनी आमदार लहामटे यांच्याप्रमाणे ३६ गावात महाविकास आघाडीचे वर्चस्व सिद्ध झाल्याचा सूर आळवला. भाजपचे तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे यांनी कळस बुद्रुक, देवठाण, उंचखडक बुद्रुक, गणोरे, सुगाव खुर्दसह ४५ गावांवर विजयाचा दावा केला आहे. मेहेंदुरी येथे पिचड समर्थक फरगडे यांच्या गटाला धक्का देत माजी सरपंच भाऊसाहेब येवले यांच्या गटाने राष्ट्रवादीच्या एका गटाची साथ घेत सत्तेची सूत्रे आपल्या हाती घेतली. कळस येथे जिल्हा परिषद सदस्य कैलास वाकचौरे व भाऊसाहेब पुंजा वाकचौरे यांनी १३ पैकी १३ जागा जिंकल्या. देवठाण येथे १७ पैकी १६ जागा जिंकत पंचायत समितीचे माजी सदस्य अरुण शेळके गटाने महाविकास आघाडीच्या सत्ताधारी अशोकबाबा शेळके गटाला पराभवाची धूळ चारली. कोतुळ येथे १७ पैकी १४ जागा मिळवत पिचड समर्थक राजू पाटील देशमुख गटाने राष्ट्रवादीचे लहामटे समर्थक हेमंत देशमुख यांच्या गटाची साथ घेत जिल्हा परिषद सदस्य रमेशकाका देशमुख गटाला चितपट केले.
लिंगदेव, लहीत बुद्रुक येथे महाविकास आघाडीची सरशी दिसत असून ब्राह्मणवाडा ग्रामपंचायतीत भाजपच्या महिला आघाडीच्या प्रमुख शारदा गायकर व सेनेचे कमलेश गांधी गटास पराभव स्वीकारावा लागला. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे यांच्या टाकळी गावात त्यांच्या सत्ताधारी पॅनलला ४ तर प्रतिस्पर्धी शेवाळे गटास ५ जागा मिळाल्या आहेत.
धामणगाव आवारी येथे भाजपचे बाळासाहेब भोर व सेनेचे आप्पासाहेब आवारी यांच्या पॅनेलने १० जागांवर वर्चस्व सिद्ध केले आहे. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दादापाटील वाकचौरे यांच्या पिंपळगाव निपाणी मध्ये त्यांच्या गटास सहा जागा मिळाल्या तर विरोधकांना तीन जागांवर समाधान मानावे लागले. गणोरेत भाजपला ९ तर आघाडीला ४ जागा जिंकता आल्या.