अकोले पंचायत समितीत राजकारण तापले; भाजपची गटनोंदणी फसली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 11:46 AM2019-12-06T11:46:10+5:302019-12-06T11:46:31+5:30

 जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट मधून एक सदस्य सेनेचे अकोले पंचायत समितीचे उपसभापती यांच्याबरोबर गेल्याने ही गटनोंदणी झालीच नाही. भाजपला हा मोठा दणका असून तालुक्याचे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. 

Akole panchayat committee heated politics; BJP's alliance fraudulent | अकोले पंचायत समितीत राजकारण तापले; भाजपची गटनोंदणी फसली

अकोले पंचायत समितीत राजकारण तापले; भाजपची गटनोंदणी फसली

अकोले : अकोले पंचायत समितीचे भाजपचे चार व माजी आमदार वैभव पिचड यांच्यासोबत राष्ट्रवादीतून भाजपात आलेले चार असे आठ सदस्य गटनोंदणी करण्यासाठी सोमवारी एकत्र अहमदनगरला पोहचले.  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट मधून एक सदस्य सेनेचे पंचायत समितीचे उपसभापती यांच्याबरोबर गेल्याने ही गटनोंदणी झालीच नाही. भाजपला हा मोठा दणका असून तालुक्याचे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. 
अकोले पंचायत समितीत विद्यमान सभापती-उपसभापतीपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाल संपला असून लवकरच सभपतीपदाची सोडत होणार आहे. सभापती व उपसभापती पदाचे पंचायत समिती सदस्यांना वेध लागले आहेत. सोमवारी सकाळी भाजपचे दत्ता देशमुख, दत्तात्रय बो-हाडे, उर्मिला राऊत, अलका अवसरकर आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतून भाजपात दाखल झालेले माधवी जगधने, गोरक्ष पथवे, सीताबाई गोंदके, सारिका कडाळे असे आठ सदस्य भाजपची गट नोंदणी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अहमदनगर येथे एकत्र गेले. त्यांच्या सोबत पिचड यांचे खाजगी स्विय सहाय्यक होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटमधून राष्ट्रवादीचे गटनेते गोरक्ष पथवे यांनी भाजप सदस्यांसोबत न जाण्याचा पवित्रा घेतला. ते विद्यमान उपसभापती मारुती मेंगाळ यांच्यासोबत निघून आले. या वृत्तास मेंगाळ यांनी लोकमतशी बोलताना दुजोरा दिला आहे.
अकोले पंचायत समितीत सेनेचे सभापती रंजना मेंगाळ, उपसभापती मारुती मेंगाळ, देवराम सामेरे, नामदेव आंबरे असे चार सदस्य आहेत. उपसभापती मारुती मेंगाळ सोडता विधानसभेच्या निवडणुकीत सर्व पंचायत समिती सदस्य भाजप उमेदवाराच्या प्रचारात होते. सेनेच्या उपसभापती मेंगाळ यांनी उघडपणे राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार केला. भाजपला पराभवास सामोरे जावे लागल्याने भाजपात गेलेल्यांची चलबिचल सुरु झाली आहे. 
सभापतीपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव होते. मात्र सेनेच्या अंतर्गत गटबाजीमुळे आदिवासी ठाकर समाजातील रंजना मेंगाळ यांना सभापतीपद मिळाले. राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सेनेचे सभापती उपसभापती झाले व भाजपला विरोधात बसावे लागले. आता आठ विरुध्द चार असे चित्र बदललेले दिसते. मात्र पंचायत समितीत भाजपचे बहुमत दिसत असतानाच पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादीच्या गटनेत्याने पिचड विरोधी भूमिका घेतल्याने राजकीय गोंधळ उडाला आहे.
आमची गट भाजपची नोंदणी अडीच वर्षांपूर्वी झाली नव्हती. काल परवा गटनोंदणीसाठी आमचे पंचायत समिती सदस्य अहमदनगरला गेले होते. गटनोंदणी झाली की नाही हे मला माहित नाही, असे भाजपा तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे यांनी सांगितले. 
    

Web Title: Akole panchayat committee heated politics; BJP's alliance fraudulent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.