१९ गावांत ‘किस्मत के सिकंदर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:23 AM2021-01-19T04:23:37+5:302021-01-19T04:23:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : जिल्ह्यात ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर होऊन आपल्या वर्चस्वाने ज्याने-त्याने विजय मिळवला. परंतु काही गावांतील उमेदवारांना ...

Alexander the Great in 19 villages | १९ गावांत ‘किस्मत के सिकंदर’

१९ गावांत ‘किस्मत के सिकंदर’

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : जिल्ह्यात ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर होऊन आपल्या वर्चस्वाने ज्याने-त्याने विजय मिळवला. परंतु काही गावांतील उमेदवारांना मात्र विजयासाठी नशिबावर विसंबून राहावे लागले. कारण या उमेदवारांना व त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना समसमान मते मिळाली. त्यामुळे या ठिकाणी चिठ्ठ्या टाकून विजयी उमेदवारांची निवड करण्यात आली. जिल्ह्यातील १९ गावात १९ जागांवर असे ‘किस्मत के सिकंदर’ ठरले.

राहुरी तालुक्यातील चेडगावमधील प्रभाग क्रमांक दोनमध्ये परसराम नारायण हापसे व त्यांचे प्रतिस्पर्धी नंदा दीपक ताके यांना समसमान २९४ मते पडली. विशेष म्हणजे याच प्रभागात निर्णायक एक मत ‘नोटा’ला पडले. त्यामुळे या मताने येथे चिठ्ठी टाकायला भाग पाडले. लहान मुलाच्या हाताने चिठ्ठी टाकली, तर यात नंदा ताके विजयी ठरल्या. नगर तालुक्यातील रतडगाव येथे अफसाना सय्यद व सुषमा भोपे यांना समसमान १२४ मते पडली. या ठिकाणी चिठ्ठीद्वारे भोपे विजयी झाल्या.

नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे राधा कुसळकर व सविता देसाई यांना समान ४०४ मते मिळाली. येथे चिठ्ठीने सविता देसाई यांना कौल दिला. तसेच वरखेड (ता. नेवासा) येथे शशिकला खरे व राजेंद्र कसबे यांना समान ३५१ मते मिळाली. चिठ्ठीतून शशिकला खरे विजयी ठरल्या. राहाता तालुक्यातील वाळकी येथे राधिका दिघे व सोनम शेख यांना समान मते मिळाली. त्यात सोनम शेख चिठ्ठीतून विजय झाल्या. कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू येथे घनशाम जाधव व तुकाराम जाधव यांना समान २८८ मते पडली. यात चिठ्ठीद्वारे घनशाम जाधव विजयी ठरले. श्रीरामपूर तालुक्यातील मालुंजा येथे मीराबाई बडाख व संगीता बडाख यांना समान ३०७ मते मिळाली. येथे एक पोस्टल मतही प्राप्त झाले होते. परंतु तेही बाद झाले. त्यामुळे चिठ्ठीतून संगीता बडाख विजयी झाल्या.

याशिवाय पारनेर तालुक्यातील पळवे खुर्द, सांगवीसूर्या व अळकुटी, पाथर्डी तालुक्यातील बाबुर्डी, खरवंडी, धामणगाव, देवराई, जवखेडे दुमाला, जोगेवाडी, तर शेवगाव तालुक्यातील दहिफळ व चापडगाव येथेही प्रत्येकी एक जागा चिठ्ठीवरच विजयी ठरली.

-------------

बहुमतच ठरले चिठ्ठीवर

नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथे अभिजित घोडेचोर व एकनाथ घोडेचोर यांना समान ३३८ मते पडली. यात चिठ्ठीवर एकनाथ घोडेचोर विजयी ठरले. विशेष म्हणजे या गावात चैतन्य नागनाथ ग्रामविकास व चैतन्य नागनाथ जनविकास या दोन्ही पॅनलला समान ५ जागा मिळाल्या होत्या. चिठ्ठीद्वारे विजयी झालेले एकनाथ घोडेचोर हे जनविकास पॅनेलचे उमेदवार होेते.

त्यामुळे येथे चिठ्ठीने बहुमतावर शिक्कामोर्तब केले. ------------

खर्ड्यात ‘नोटा’ला सर्वाधिक मते

जामखेड तालुक्यातील खर्डा ग्रामपंचायतीतील प्रभाग क्रमांक पाचमध्ये आगळीवेगळी लढत झाली. येथे चक्क मतदारांनी उमेदवारांपेक्षा नोटा बटनालाच अधिक पसंती दिली. येथे उमेदवार शीतल सुग्रीव भोसले यांना ३९६, तर ‘नोटा’ला ५०२ मते पडली. त्यामुळे सर्वच चक्रावले. परंतु नियमानुसार ज्या ठिकाणी उमेदवारांपेक्षा ‘नोटा’ला मते अधिक असतात, त्या ठिकाणी ‘नोटा’नंतर जास्त मते असणारा उमेदवार विजयी घोषित केला जातो, असे निवडणूक निर्णय अधिकार देविदास घोडेचोर यांनी सांगितले. त्यानुसार शीतल भोसले या विजयी झाल्या.

------------

तुरुंगातून निवडणूक लढवून विजयी

जामखेड तालुक्यातील नाहोली ग्रामपंचायतीतील उमेदवार काकासाहेब बबन गर्जे हा तुरुंगात असतानाही निवडून आला. गर्जे हा २०१८मध्ये झालेल्या दुहेरी हत्याकांडात आरोपी असून, सध्या जामखेड तुरुंगात आहे. त्याने निवडणूक अर्ज भरण्यासाठी दोन दिवसांची सुटी घेतली होती. अर्ज भरल्यानंतर पुन्हा त्याची रवानगी तुरुंगात झाली. सोमवारी लागलेल्या निकालात तो विजयी ठरला.

Web Title: Alexander the Great in 19 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.