संगमनेर बसस्थानकातून ग्रामीण वगळता इतर सर्वच फेऱ्या रद्द
By शेखर पानसरे | Updated: October 31, 2023 12:40 IST2023-10-31T12:40:02+5:302023-10-31T12:40:17+5:30
संगमनेर बसस्थानकातून प्रवाशांच्या सोईसाठी मोठ्या प्रमाणात बसेस सुटतात. लांब पल्ला, मध्यम पल्ला, ग्रामीण फेऱ्या तसेच बसेस मुक्कामी देखील जातात.

संगमनेर बसस्थानकातून ग्रामीण वगळता इतर सर्वच फेऱ्या रद्द
लोकमत न्यूज नेटवर्क
संगमनेर : मराठा आरक्षणासाठी राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संगमनेर आगारातील बसेसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. दररोज होणाऱ्या ३९४ फेऱ्यांपैकी केवळ ग्रामीण फेऱ्या सुरू आहेत. अशी माहिती संगमनेर आगारप्रमुख प्रशांत गुंड यांनी दिली.
संगमनेर बसस्थानकातून प्रवाशांच्या सोईसाठी मोठ्या प्रमाणात बसेस सुटतात. लांब पल्ला, मध्यम पल्ला, ग्रामीण फेऱ्या तसेच बसेस मुक्कामी देखील जातात. ग्रामीण भागातून विद्यार्थी मोठ्या संख्येने शहरातील शाळा, महाविद्यालये येथे शिक्षणासाठी येतात. ग्रामीण भागातही बसेस मुक्कामी पाठविण्यात येतात. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी केवळ ग्रामीण फेऱ्या सुरू आहेत. लांब पल्ला, मध्यम लांब पल्ला असलेल्या सर्वच फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
मंगळवारी (दि.३१) सकाळी पुणे येथे चार, अहमदनगर येथे दोन तर मुंबई येथे एक बस सोडण्यात आली होती. नाशिक-पुणे महामार्गावर शिंदे पळसे (जि. नाशिक) येथे आंदोलन सुरू असल्याने मुंबईला आणि त्याचबरोबरच पुणे, अहमदनगर येथे जाणाऱ्या बसेस मागे बोलावून घेण्यात आल्या. वरिष्ठांचे आदेश आल्यास सुरू असलेल्या फेऱ्या रद्द होतील. असेही आगारप्रमुख गुंड यांनी सांगितले.