नगरमध्ये आरोग्यसेवावगळता सर्व व्यवहार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:16 AM2021-05-03T04:16:10+5:302021-05-03T04:16:10+5:30

अहमदनगर : नगरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने महापालिकेने कठोर पावले उचलली असून, येत्या १० मेपर्यंत कडक निर्बंध लागू केले ...

All transactions in the town except healthcare are closed | नगरमध्ये आरोग्यसेवावगळता सर्व व्यवहार बंद

नगरमध्ये आरोग्यसेवावगळता सर्व व्यवहार बंद

अहमदनगर : नगरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने महापालिकेने कठोर पावले उचलली असून, येत्या १० मेपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. तसा आदेश महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी रविवारी जारी केला. त्यामुळे शहरात आता फक्त वैद्यकीय सेवाच सुरू राहणार आहेत.

नगरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. शनिवारी जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा चार हजारांच्या पार गेला. यापैकी ८१७ रुग्ण नगर शहरात आढळून आल्याने महापालिकेने कडक पावले उचलली आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांच्यासह आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे यांनी शनिवारी रात्री रस्त्यावर उतरून कडक निर्बंधाचे पालन करण्याचे आवाहन केले. यासंदर्भात आयुक्त गोरे यांनी रविवारी आदेश जारी केला असून, रविवारी मध्यरात्रीपासून आरोग्यसेवावगळता सर्व दुकाने, आस्थापना, भाजीपाला विक्री, खासगी आस्थापना बंद राहणार आहेत. पुढील १० मेपर्यंत हा आदेश लागू राहणार असून, अनावश्यक नागरिकांना घराबाहेर पडता येणार नाही, असा आदेश देण्यात आला आहे. महापालिकेचे शहर व परिसरात ४ प्रभाग कार्यालये आहेत. या कार्यालयांच्या प्रभाग अधिकाऱ्यांनाही तसे आदेश देण्यात आले आहेत. नियमांचे पालन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यासाठी चार भरारी पथकांची नेमणूक महापालिकेकडून करण्यात आली आहे.

.....

नगरमध्ये हे राहणार सुरू

-औषध दुकाने

-अत्यावश्यक सेवेसाठी पेट्रोलपंप नियमित वेळेनुसार सुरू राहतील

-घरपोहोच गॅस वितरणसेवा सुरू राहील

-सर्व बँका सुरू राहतील

-दूध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू राहील

-पशुखाद्य विक्री सकाळी ७ ते ११ यावेळेत सुरू राहील

......

हे राहणार बंद

-किराणा दुकाने व तद‌्संबंधी खरेदी-विक्री

- भाजीपाला, फळे, बाजारमालाची खरेदी-विक्री

- सर्व खासगी आस्थापना पूर्णपणे बंद

- अंडी, मटन, मत्स्य विक्री बंद

.....

नगरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हा प्रशासन व महापालिकेने कडक निर्बंध लागू केलेले आहेत. कोरोनाचे गंभीर रुग्ण जिल्हाभरातून नगरमध्ये दाखल होत आहेत. परंतु, देशात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झालेला आहे. नगरमध्ये व्हेंटिलेटरचे बेड उपलब्ध होत नाहीत. नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे.

- संग्राम जगताप, आमदार

Web Title: All transactions in the town except healthcare are closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.