कुकडीच्या पाण्यासाठी न्यायालयीन लढाईचीही तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:16 AM2021-05-31T04:16:39+5:302021-05-31T04:16:39+5:30
श्रीगोंदा : कुकडी प्रकल्पातील पाण्याचे समन्यायी वाटप होऊन हक्काचे पाणी मिळावे यासाठी डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकरी एकत्र येण्यास सुरुवात ...
श्रीगोंदा : कुकडी प्रकल्पातील पाण्याचे समन्यायी वाटप होऊन हक्काचे पाणी मिळावे यासाठी डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकरी एकत्र येण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी हक्काच्या पाण्यासाठी न्यायालयीन लढाई लढण्याचीही तयारी असल्याचे शेतकरी म्हणाले. रविवारी पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांची पहिली बैठक पारगाव सुद्रिक येथे पार पडली.
या बैठकीत कुकडीतील हक्काच्या पाण्यासाठी लढा देण्याचा निर्धार करण्यात आला. कुकडी प्रकल्पावरील डाव्या कालव्याच्या लाभधारक शेतकऱ्यांना दरवेळी हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. त्यामुळे पारनेर तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना एकत्र आणून या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पारनेर येथील शेतकऱ्यांनी कुकडी संघर्ष समिती स्थापन केली. ही समिती विविध ठिकाणी बैठका घेत आहे.
कुकडीच्या समन्यायी पाणी वाटपासाठी या समितीकडून राज्य जलसंपत्ती प्राधिकरणाकडे दावा दाखल करण्यात येणार आहे. या संघर्षात राजकारण होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी राजकीय नेतेविरहित संघर्ष उभा करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी शेतकरीच पुढाकार घेणार असून शेतकरी निधी उभारणार आहेत.
श्रीगाेंद्यात या लढ्यासाठी शेतकऱ्यांचा एक गट स्थापन करण्यात आला आहे. यात कुकडी लाभक्षेत्रातील शेतकरी सहभागी आहेत.
या बैठकीला पारनेर येथील रामदास घावटे, सतीश रासकर, मंगेश सालके, गोरख सालके, विशाल सिन्नलकर आदी शेतकरी उपस्थित होते. बैठकीत दिनकर पंधरकर, मारुती भापकर, पुरुषोत्तम लगड, ॲड. समित बोरुडे, अरविंद कापसे आदी शेतकऱ्यांनी पाणीप्रश्नी भूमिका मांडली. राजेंद्र काकडे यांनी सूत्रसंचालन केले.