अमर शेख यांना काढायचे होते शाहिरी विद्यापीठ
By सुधीर लंके | Published: August 29, 2020 03:45 PM2020-08-29T15:45:10+5:302020-08-29T15:46:55+5:30
मरण आले तर ते लाखो लोकांपुढे गाताना यावे, अशी इच्छा बाळगणा-या लोकशाहीर अमर शेख यांनी राज्यात शाहिरी विद्यापीठ काढण्याचा प्रकल्प हाती घेतला होता. त्यासाठी त्यांनी नगर जिल्ह्यात जमिनही खरेदी करुन आराखडाही तयार केला होता. पण अपघाती निधनामुळे त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरले नाही. त्यांच्या पश्चात सरकारनेही हा प्रकल्प साकारला नाही.
स्मृतिदिन विशेष
अहमदनगर : मरण आले तर ते लाखो लोकांपुढे गाताना यावे, अशी इच्छा बाळगणा-या लोकशाहीर अमर शेख यांनी राज्यात शाहिरी विद्यापीठ काढण्याचा प्रकल्प हाती घेतला होता. त्यासाठी त्यांनी नगर जिल्ह्यात जमिनही खरेदी करुन आराखडाही तयार केला होता. पण अपघाती निधनामुळे त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरले नाही. त्यांच्या पश्चात सरकारनेही हा प्रकल्प साकारला नाही.
आपल्या शाहिरीने संयुक्त महाराष्ट्राचा लढा गाजविणारे अमर शेख हे शाहिरीचा वारसा पुढील पिढीत रुजविण्यासाठी आपल्या हयातीत तरुणांची शिबिरे घेत होते. महाराष्ट्रात हा संतांचा, वीरांचा व शाहिरांचा देश आहे. मनोरंजन व लोकशिक्षणासाठी येथील शाहीर झिजले. येथील शाहिरी कला ही महान असल्यामुळे हा वारसा नवीन पिढीत जाण्यासाठी ‘शाहिरी विद्यापीठ’ काढावे असे त्यांचे स्वप्न होते.
शाहिरी विद्यापीठ हे राज्याच्या मध्यभागी असावे यासाठी नाशिक व नगर जिल्ह्यात ते जागा शोधत होते. नाशिकमध्ये शरणपूर भागात त्यांनी जमिनही खरेदी केली. पण त्यांच्या मनात असलेल्या आराखड्यात ती बसत नव्हती. श्रीरामपूर (जि. नगर) तालुक्यातील खंडाळा परिसरातही जमीन खरेदी केली. पण तेथे पाण्याचा प्रश्न भेडसावला.
अखेर नगर जिल्ह्यातील बोधेगाव (ता. शेवगाव) येथे साडेसोळा एकर जमीन खरेदी केली. शेवगाव तालुक्यातील कॉ. आबासाहेब काकडे यांनी या कल्पनेला उचलून धरले होते. या जागेत विहीर खोदण्यात आली, तसेच व्यवस्थापनासाठी विदर्भातील शाहीर अजानराव पोटे यांनाही शेख यांनी बोलावून घेतले होते. वसतीगृह, नऊ हॉल, शाहिरी शिकविणा-या प्राध्यापकांची निवास व्यवस्था, मोठे सभागृह, वृद्ध शाहिरांसाठी ‘शाहीर नगर’ असा नकाशाही तयार करण्यात आला होता. काही जमिनीत शेतीचे उत्पन्न घ्यायचे व त्यातून विद्यापीठ चालवायचे असे आर्थिक नियोजन होते. या विद्यापीठाचा अभ्यासक्रम व प्रवेशाची पात्रता देखील ठरली होती. आचार्य अत्रे, जिल्ह्यातील कम्युनिस्ट नेते कॉ. पी.बी. कडू, कॉ. श्रीराम रानडे हे देखील या प्रकल्पाच्या पाठिशी होते. परंतु २९ आॅगस्ट १९६९ रोजी अमर शेख यांचे अपघाती निधन झाल्याने त्यांचे हे स्वप्न अपूर्ण राहिले. कॉ. आबासाहेब काकडे यांचे चिरंजीव शिवाजीराव काकडे यांच्याकडे यासंदर्भातील दस्तावेज आजही उपलब्ध असून ‘आबासाहेब आणि मी’ या पुस्तकात हे सर्व संदर्भ त्यांनी नोंदविले आहेत.
अमर शेख यांनी नगर जिल्ह्यात शाहिरी विद्यापीठ साकारण्यासाठी आराखडा बनविला होता. माझे वडील कॉ. आबासाहेब काकडे हेही या प्रकल्पासोबत होते. दुर्दैवाने हे विद्यापीठ साकारले नाही. या विद्यापीठाचा आराखडा उपलब्ध आहे. हा कल्पक विचार होता. शाहिरी व लोककला जपण्यासाठी अशा विद्यापीठाची गरज आहे. सरकारने असे विद्यापीठ निर्माण करुन अमर शेख यांचे स्वप्न पूर्ण करावे.
- अॅड. शिवाजीराव काकडे, शेवगाव.