हौशी राज्य नाट्य स्पर्धा २०१८ : ‘हौसेचं’ उदरभरणम्
By साहेबराव नरसाळे | Published: November 25, 2018 03:59 PM2018-11-25T15:59:14+5:302018-11-25T15:59:46+5:30
राज्य नाट्य स्पर्धेच्या नवव्या दिवशी नगर केंद्रावर नटेश्वर कला क्रीडा मंडळाच्यावतीने सुहास भोळे लिखित व राजेंद्र क्षीरसागर दिग्दर्शित उदरभरणम् हे नाटक सादर करण्यात आले़
राज्य नाट्य स्पर्धेच्या नवव्या दिवशी नगर केंद्रावर नटेश्वर कला क्रीडा मंडळाच्यावतीने सुहास भोळे लिखित व राजेंद्र क्षीरसागर दिग्दर्शित उदरभरणम् हे नाटक सादर करण्यात आले़ स्मशानातील स्मशानबाबाचा पोेटासाठीचा संघर्ष आणि त्याच स्मशानात प्रेतांसोबत शारीरिक उपभोग घेणारा व्यक्ती यांच्या कृ्ररतेवर आधारलेलं हे नाटक़ प्रश्न असतो एकाच्या पोटाचा तर दुसऱ्याच्या वासनेचा़ एकजण पोटाची आग भागविण्यासाठी तर दुसरा वासनेची आग शमविण्यासाठी स्मशानाची संगत करतात, असं हे कथानक़ स्मशानातील बाबावर ‘स्मशानजोगी’ हे नाटक यापूर्वी सादर झाले़ ‘मुलगी वाचवा’ असा स्पष्ट संदेश त्यातून देण्यात आला होता़ परंतु या नाटकातून नेमका काय संदेश द्यायचा आहे, हेच कळत नाहीत़ स्मशानबाबा आणि त्यातील इतर पात्रांची विकृतीच या नाटकात जास्त भडक होत जाते, असे दिसते़ सर्वच पात्रांचा अभिनय, तांत्रिक बाबीही जेमतेम राहिल्या़
या नाटकातील बाबा ही मुख्य भूमिका राजेंद्र क्षीरसागर यांनी साकारली़ क्षीरसागर यांचा अभिनयातील दीर्घ अनुभव पाहता त्यांचा ‘उदरभरणम्’ या नाटकातील अभिनय जरा ‘लाऊडच’ वाटला़ ते जाणूनबुजून की अनावधानाने झाले, या प्रश्नाचे उत्तर त्यांनाच माहिती़ पण ते प्रेक्षकांना खटकत होते़ बेबीची भूमिका करणाºया निकिता कुलकर्णी यांनी बेअरींग शेवटपर्यंत जपली, हे कौतुकास्पदच़ पण वाचिक अभिनय तेव्हढा भावला नाही़ बाबा व बेबी यांच्यातील प्रसंग, संवादाची पुन:रुक्ती टाळता आली असती़ मात्र, ‘मला भूक लागली, मला आई दिसतेय, जेवण आणतो, आता प्रेत येईल, पैसे मिळतील, जेवण मिळेल’, अशा आशयांचे येणारे वारंवार संवाद ऐकायलाही नको वाटतात, हे त्यांची पुन:रुक्ती झाली आहे़ ती टाळता आली असती़ मवाली यांच्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न संजय हुडे यांनी केला़ प्रेतांचा उपभोग घेणारा व्यक्ती श्रीराम कुलकर्णी यांनी चांगला रंगवला़ त्यांच्या संवादातील आरोह-अवरोह आणि वाचिक अभिनयामुळे नाटकात थोडी रंगत आली़ इतरांचा अभिनय केवळ आले आणि गेलेएव्हढ्याच चौकटीतला़
नाटकातील तांत्रिक बाबीही खूप अशक्त होत्या़ मवालीचा खून होतो, त्यावेळी बाबा त्याला ओढत पुरण्यासाठी नेतो़ मात्र, त्यावेळी प्रकाश योजनाकाराने लवकर प्रकाश बंद करणे अपेक्षित होते़ त्याने प्रकाश सुरुच ठेवला़ त्यामुळे कलाकारांनी प्रकाश बंद होण्याची म्हणजे फेडआऊटची वाट न पाहता रंगमंचावरुन पळ काढला़ नंतर प्रकाश बंद झाला़ संगीत यथातथाच होते़ नेपथ्य कथेनुरुप चांगले राहिले़ कलाकारांची रंगभूषा, वेशभूषा साजेशी होती़ नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा या नाटकाच्या जमेच्या बाजू राहिल्या़
कलाकार
राजेंद्र क्षीरसागर (भूमिका :बाबा)
निकिता कुलकर्णी
(भूमिका : बेबी)
संजय हुडे (भूमिका : मवाली)
श्रीराम कुलकर्णी
(भूमिका : व्यक्ती)
अविनाश ओहोळ
(भूमिका : माणूस)
राजेश मंचरे (भूमिका :फादर)
तंत्रज्ञ
दिग्दर्शक : राजेंद्र क्षीरसागर
नेपथ्य : देविदास जगधने, मनोज रासने
प्रकाश योजना : संजय वाणी
पार्श्वसंगीत : बाबा कराळे, सौरभ क्षीरसागर
रंगभूषा : प्रशांत सूर्यवंशी
वेशभूषा : रवींद्र खिलारी
आज सादर होणारे नाटक
भयरात्र