हौशी राज्य नाट्य स्पर्धा २०१८ : फसलेले ‘तुकाराम कोळ्याची पोर’
By साहेबराव नरसाळे | Published: November 17, 2018 11:19 AM2018-11-17T11:19:08+5:302018-11-17T11:32:53+5:30
‘तुकाराम कोळ्याची पोर’ हे भालचंद्र कुबल लिखित आणि संदीप कदम दिग्दर्शित नाटक हौशी राज्य नाट्य स्पर्धेच्या पहिल्या दिवशी नगर केंद्रावर श्रीरामपूरच्या अपंग सामाजिक विकास संस्थेने सादर केले.
साहेबराव नरसाळे
‘तुकाराम कोळ्याची पोर’ हे भालचंद्र कुबल लिखित आणि संदीप कदम दिग्दर्शित नाटक हौशी राज्य नाट्य स्पर्धेच्या पहिल्या दिवशी नगर केंद्रावर श्रीरामपूरच्या अपंग सामाजिक विकास संस्थेने सादर केले.
रेल्वे प्रकल्पासाठी होणाऱ्या जमीन अधिग्रहणातील घोटाळे आणि त्यातून निर्माण झालेल्या प्रश्नांच्या जंजाळात नव्या पिढीतील संघर्ष ‘तुकाराम कोळ्याची पोर’ या नाटकात पहायला मिळतो. रेल्वेलाईनसाठी जमीन अधिग्रहण करण्याच्या निवेदनाने नाटकाचा पडदा उघडतो. रेल्वे अधिकारी हे निवेदन सादर करतो. शेतक-यांचा आणि परिसराचा कसा विकास होणार आहे, हे रेल्वे अधिकारी सांगतो आणि येथेच पहिला प्रवेश संपतो. पहिला प्रवेश जेथे सुरु झाला, तेथेच दुसरा प्रवेश झाला. म्हणजे नेपथ्यात जो बदल हवा होता तो झालाच नाही. दुसरा प्रवेश सुरु झाला सगुणशेठ म्हात्रे याच्या दृश्याने. सगुणशेठ म्हात्रेची भूमिका नवनाथ कर्डिले यांनी साकारली. सगुणशेठ एका पायाने अधू असतात. परंतु पहिल्याच दृश्यात सिगारेट पेटवताना बेअरिंग सांभाळण्याचे ते विसरले असावेत. पुढे त्यांनी बेअरिंग उत्तम सांभाळले. सगुणशेठच्या भूमिकेला न्याय देताना कर्डिले यांचा वाचिक अभिनय कमी पडला. संवादानुरुप त्यांच्या चेह-यावरचे भाव बदलताना दिसले नाहीत. आवाजात ती जरब जाणवली नाही. सगुणशेठचा मुलगा प्रितम म्हात्रे हा आमदार असतो. प्रितमची भूमिका सौरभ संकपाल यांनी केली. सगुणशेठची अनौरस मुलगी नंदिनी कोळी हिची भूमिका सिमरन गोयल यांनी साकारली. प्रितम आणि नंदिनी यांच्यात नेहमी खटके उडत असतात. रेल्वे प्रकल्पासाठी जाणा-या जमिनीचे प्रितमला राजकारण करायचे असते तर त्याच कामाचे सर्वेक्षण नंदिनी करीत असते. अनौरस मुलगी असल्याचे शल्य आणि प्रितमकडून मिळणा-या दुय्यम वागणुकीचे शल्य नंदिनीच्या बोलण्या-वागण्यातून प्रतिबिंबीत होत राहते. त्यायोगे नंदिनीच्या भूमिकेला सिमरन यांनी चांगला न्याय दिला. तर आमदाराचा बाज आणि कौटुंबिक नात्यांची वीण यांची सांगड घालण्यात सौरभ संकपाल कमी पडले. ब-याच प्रसंगात ते संवादही विसरले. त्यांचे फ्लंबिंगही खूप झाले. आमदार प्रितम यांची कार्यकर्ती असलेल्या ज्योती पाटील यांची पहिल्या अंकाच्या अखेरीस एन्ट्री होते. ज्योती पाटीलची भूमिका जया अस्वले यांनी केली. जया अस्वले यांचा अभिनय एकूणच चांगला राहिला. कायिक, वाचिक अभिनयाच्या बळावर नाटकात त्यांनी जीव ओतण्याचे काम केले. त्यांच्या अभिनयामुळे नाटकात थोडी रंगत आली. रेल्वे प्रकल्पात जाणा-या शेतक-यांच्या जमिनी विकत घेऊन एकीकडे शेतक-यांचा कैवारी असल्याचे भासवायचे तर दुसरीकडे त्यातून बक्कळ नफा कमवायचा असा सल्ला ज्योती या आमदार प्रितमला देतात. ते तयारीला लागतात. येथे पहिला अंक संपतो.
रेल्वे प्रकल्पात ११० कोटींची गुंतवणूक केली आहे, असे प्रितम वडील सगुणशेठ यांना सांगतो. या प्रसंगाने दुस-या अंकाचा पडदा उघडतो. प्रितम आणि सगुणशेठचे बोलणे संपल्यानंतर सगुणशेठ सोफ्यावर बसून मोबाईल काढून नंदिनीला फोन लावत असतो. त्याचवेळी घेतलेला फेडआऊट न कळण्यासारखाच. एकूण नाटकात प्रकाश योजनेकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज होती. पण अनेक प्रसंगात कलाकारांना प्रकाश योजनेशी समायोजन साधता आले नाही. तर अनेकदा फेडआऊट आणि फेडइन करताना प्रकाश योजनाकारांची गफलत झाली. पहिल्या अंकात एकदमच कमी असलेले संगीत दुस-या अंकात एकदम ‘लाऊड’ झाले. त्यामुळे संवाद प्रेक्षकांपर्यंत व्यवस्थित पोहोचले नाहीत. अनेक प्रसंगात संवादात ताळमेळ नसल्याचे जाणवले. नाटकाच्या शीर्षकावरुन नंदिनी ही या नाटकातील मुख्य भूमिका असावी, असे वाटते. नंदिनीही सगुणशेठला म्हणते, ‘तुकाराम कोळ्याची पोर’ असं मला म्हणण्यास सांगून तीच मुख्य पात्र असल्याचे दर्शविते. पण नाटकात आमदार प्रितम म्हात्रे हे पात्रच केंद्रस्थानी राहते. रंगमंचावर सर्वाधिक वावर याच पात्राचा राहिला.
कथा, अभिनय, प्रकाश योजना, संगीत अशा सर्वच पातळ्यांवर या नाटकाने प्रेक्षकांची निराशा केली. इतर पात्रेही काही विशेष योगदान देऊ शकले नाहीत. नंदिनी गाव सोडून जात असताना आमदार प्रितम तिला आडवा येतो आणि जाऊ नको, असं बजावतो. त्यावेळी तो नंदिनीवर पिस्तूल रोखतो. त्यावेळी सगुणशेठ मध्ये पडतो. त्यांच्या झटापटीत गोळी उडल्याचा आवाज येतो. पण त्या बंदुकीतील गोळी नेमकी कोणाला लागली, याचे कोडे प्रेक्षकांना पडले.
कलाकार - भूमिका
नवनाथ कर्डिले -सगुणशेठ म्हात्रे
सौरभ संकपाल -प्रितम म्हात्रे
सिमरन गोयल -नंदिनी कोळी
जया अस्वले - ज्योती पाटील
अभिषेक आढळराव - प्रांताधिकारी
संतोष माने - रेल्वे अधिकारी
गणेश मगरे - गण्या
ऋतुराज जाधव - गावकरी
अदिनाथ चव्हाण - गावकरी
अर्जुन तिरमखे - जग्या
तंत्रज्ञ
संदीप कदम - दिग्दर्शक
शुभम केनेकर - पार्श्वसंगीत
मुनीर सय्यद,- नेपथ्य
अमित कर्डिले
गणेश ससाणे - प्रकाशयोजना
परीक्षित व प्रिया मोरे- रंगभूषा
स्वामी मुळे - वेषभूषा
आजचे नाटक - छत्रपती शिवरायांचा जिहाद