सहकारात घोटाळे कोणाचे? समित्या खूप झाल्या आता निर्णय घेणार; अमित शहांनी स्पष्टच सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 05:37 AM2021-12-19T05:37:57+5:302021-12-19T05:39:02+5:30
पंतप्रधान मोदींनी सहकार मंत्रालय का सुरू केले म्हणून हे शंका घेतात. पण आमचा हेतू प्रामाणिक आहे, असे अमित शहा म्हणाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणी (अहमदनगर) : सहकार चळवळ मोडण्यासाठी नव्हे तर जोडण्यासाठी मी सहकारमंत्री झालो आहे. विरोधकांनी या चळवळीकडे राजकारण म्हणून पाहू नये. सहकार चळवळीसाठी आजवर समित्याच खूप झाल्या. आता थेट निर्णय घेतले जातील, असे प्रतिपादन केंद्रीय सहकार तसेच गृहमंत्री अमित शहा यांनी प्रवरानगर येथे केले.
शहा यांच्या उपस्थितीत सहकार परिषदेचे आणि शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अध्यक्षस्थानी होते. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मंत्री डॉ. भागवत कराड, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, परिषदेचे निमंत्रक राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार सुजय विखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शहा म्हणाले, मोदींनी सहकार मंत्रालय का सुरू केले म्हणून हे शंका घेतात. पण आमचा हेतू प्रामाणिक आहे. आमच्यावर टीका करणारी हीच मंडळी सहकारात विरोधकांच्या संस्थांना कर्ज देताना अडवणूक करतात.
सहकार विद्यापीठ स्थापन करण्याचे धोरण
सहकाराबाबत विद्यापीठ स्थापन करण्याचे केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे, असेही शहा यांनी सांगितले. प्रवरानगर येथे पद्मश्री विठ्ठलराव विखे, धनंजयराव गाडगीळ, वैकुंठभाई मेहता यांनी पहिला सहकारी साखर कारखाना उभारला. येथील मातीवर सर्वांनी माथा टेकविला पाहिजे, असे गौरवोद्गार शहा यांनी काढले.