'ड' वर्ग महानगरपालिकांमध्ये अहमदनगर मनपा तिसरी, ५ कोटींचे पारितोषिक

By चंद्रकांत शेळके | Published: April 20, 2023 05:51 PM2023-04-20T17:51:11+5:302023-04-20T17:51:53+5:30

नगर विकास विभागाने राज्यातील सर्व महानगरपालिका व नगरपालिकांकरिता शहर सुधारणा व सौंदर्यीकरण स्पर्धा २०२२ आयोजित केली होती.

Among 'D' Class Municipal Corporations, Ahmednagar Municipal Corporation third, prize of 5 crores | 'ड' वर्ग महानगरपालिकांमध्ये अहमदनगर मनपा तिसरी, ५ कोटींचे पारितोषिक

'ड' वर्ग महानगरपालिकांमध्ये अहमदनगर मनपा तिसरी, ५ कोटींचे पारितोषिक

अहमदनगर : महाराष्ट्र शासनाने मागील वर्षी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शहर सौंदर्यीकरण स्पर्धेत अहमदनगर महानगरपालिकेने ड वर्ग महानगरपालिकांच्या गटामध्ये राज्यातून तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे. याबद्दल महापौरांसह आयुक्तांना ५ कोटींचे पारितोषिक देऊन गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत गौरविण्यात आले.

नगर विकास विभागाने राज्यातील सर्व महानगरपालिका व नगरपालिकांकरिता शहर सुधारणा व सौंदर्यीकरण स्पर्धा २०२२ आयोजित केली होती. यामध्ये विविध घटकांनुसार गुणांकन पद्धतीने वर्गनिहाय प्रत्येक प्रशासकीय विभागातील निवडलेल्या सर्वोत्कृष्ट महानगरपालिका व नगरपालिका यांची राज्यस्तरीय तपासणी समितीने पाहणी करून निवड केली. या स्पर्धेसाठी मध्यवर्ती चौक, ऐतिहासिक वारसा स्थळे व स्मारक, जलाशयांचे संवर्धन, बाजारपेठा यांचे सौंदर्यीकरण तसेच सुंदर हरित पट्ट्यांची निर्मिती, विविध भागांतील स्वच्छता अशा घटकांचा समावेश होता. याकरिता महानगरपालिकेने राबवलेले विविध उपक्रम निर्णायक ठरले व महापालिकेला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला.

गुरूवारी मुंबईत नगर विकास दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महापौर रोहिणी शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, महिला व बालकल्याण सभापती पुष्पा बोरुडे, आयुक्त डॉ. पंकज जावळे, उपायुक्त यशवंत डांगे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पाच कोटींचा धनादेश व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.

यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव सोनिया सेठी आदी उपस्थित होते.

Web Title: Among 'D' Class Municipal Corporations, Ahmednagar Municipal Corporation third, prize of 5 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.