व्याजाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:24 AM2021-08-22T04:24:04+5:302021-08-22T04:24:04+5:30
केडगाव : शेतकरी कर्जदारांनी सेवा सोसायटीकडे भरलेल्या व्याजाची रक्कम शेतकऱ्यांना मिळण्यासाठी नगर तालुका शिवसेनेने केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. ...
केडगाव : शेतकरी कर्जदारांनी सेवा सोसायटीकडे भरलेल्या व्याजाची रक्कम शेतकऱ्यांना मिळण्यासाठी नगर तालुका शिवसेनेने केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. यासंदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश तालुका उपनिबंधक लक्ष्मण रत्नाळे यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला दिले आहेत, अशी माहिती शिवसेनेचे नगर तालुका प्रमुख राजेंद्र भगत यांनी दिली.
यासंदर्भात तालुका प्रमुख राजेंद्र भगत, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, पंचायत समितीचे माजी सभापती प्रवीण कोकाटे, प्रकाश कुलट, जीवाजी लगड आदींसह शिवसेनेच्या शिष्टमंडळाने उपनिबंधक रत्नाळे यांची भेट घेतली होती. शेतकऱ्यांना व्याजाची रक्कम देण्यास जिल्हा बँकेकडून टाळाटाळ केली जात असल्याचे भगत यांनी निदर्शनास आणून दिले. सेवा सोसायटीच्या कर्जाची नवे-जुने फेड करताना शेतकऱ्यांनी व्याजाची रक्कम भरली होती. मात्र, राज्य शासनाने ही सहा महिन्यांपूर्वीच वर्ग केली होती. परंतु, जिल्हा बँकेकडून रकमेबाबत टाळाटाळ करण्यात येत होती.
शासनाने सहा महिन्यांपूर्वीच ही रक्कम वर्ग केली आहे, असे सांगत उपनिबंधक रत्नाळे यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यानुसार शेतकऱ्यांनी भरलेले व्याज परत लवकरच जमा होईल, असे त्यांनी सांगितले.