सुप्यात दोघांना १ लाख ३५ हजार रुपयाना गंडवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 05:53 PM2018-10-30T17:53:21+5:302018-10-30T17:54:15+5:30
नगर-पुणे रोडवरील पारनेर तालुक्यातील सुपा येथील स्टेट बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यास गेलेल्या दोन जणांना अज्ञात भामट्याने मदतीचा बहाणा करीत १ लाख 35 हजार रुपयाना गंडा घातला.
सुपा : नगर-पुणे रोडवरील पारनेर तालुक्यातील सुपा येथील स्टेट बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यास गेलेल्या दोन जणांना अज्ञात भामट्याने मदतीचा बहाणा करीत १ लाख 35 हजार रुपयाना गंडा घातला.
सुप्यातील लक्ष्मन परांडे यांना स्टेट बँकेच्या शेजारी असणा-या एटीएम मधून पैसे काढून देण्यास मदत करतो, असे सांगून त्यांचे कार्ड ताब्यात घेतले. याचदरम्यान बदललेले कार्ड घेऊन भामटा निघून गेला. थोड्याच वेळात ४० हजार रुपये दुस-याच खात्यात ट्रान्सफर केले. तर एकदा २० हजार रुपये व दुस-या वेळेत १० हजार रुपये आॅनलाईन काढले. हे लक्षात येताच त्यांनी तातडीने बँकेला कळवून सुपा पोलिसांकडे धाव घेतली. २ दिवसापूर्वी सुपा एमआयडीसी तील कामगार चाँद गुलाब शेख (राहणार- कामरगाव ता . नगर) यांनी सुपा एमआयडीसीतील पेट्रोल पम्पावरील एटीएम मधून पैसे काढताना त्यातून पैसे येत नाहीत हे पाहून त्यांच्या मागच्या अनोळखी व्यक्तीने पैसे काढून देतो असे सांगून कार्ड घेतले. हातचलाखी करून त्या भामट्याने शेख याना दुसरेच एटीएम कार्ड दिले. त्यांच्या खात्यातून ३४ हजार ६०० रुपये काढल्याचा मॅसेज आला. लक्षात आल्यावर शेख यांनी नगर येथे सायबर क्राईम कडे तक्रार नोदवली. याप्रकरणी पारनेर पोलीस तपास करीत आहेत.