रतनगडाच्या पायथ्याशी असलेले कातळशिल्प अमृतेश्वर शिवालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:23 AM2021-08-23T04:23:37+5:302021-08-23T04:23:37+5:30
श्रावण सोमवारच्या अनुषंगाने तालुक्यातील शिवालये यंदाही शिवभक्तांच्या भक्तिरसात न्हाऊन निघाली नाही. त्यात भंडारदरा व मुळा धरणाच्या पाणलोटात पाऊस ...
श्रावण सोमवारच्या अनुषंगाने तालुक्यातील शिवालये यंदाही शिवभक्तांच्या भक्तिरसात न्हाऊन निघाली नाही. त्यात भंडारदरा व मुळा धरणाच्या पाणलोटात पाऊस रुसला असून दरवर्षीप्रमाणे श्रावणसरी बरसताना दिसत नाही. अमृतवाहिनी प्रवरेच्या उगमस्थानी असलेल्या रतनवाडी येथील कातळशिल्प अमृतेश्वराचे हेमाडपंथी धाटणीचे कोरीव नक्षीकाम केलेले प्राचीन मंदिर आहे. पेशवेकालीन त्रिंबक प्रांतातील हे मंदिर बारा ज्योतिर्लिंग पैकी एक त्र्यंबकेश्वराच्या मंदिरासारखे उंच शिखराचे हे मंदिर आहे. हरिश्चंद्रगडावरील हरिश्चंद्रेश्वर हे देखील त्र्यंबकेश्वराच्या मंदिरासारखे असून मंदिराला लगत कोरीव गुहा लेणी आहेत. याच गडावर केदारेश्वराचे महाकाय पिंड शिळा असलेली गुफा लेणी एक अप्रतिम शिल्पाकृती आहे.
भंडारदरा धरण पूर्ण भल्यानंतर रतनवाडीच्या अमृतेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यातील पिंडीवर पाच ते सहा फूट पाणी असते. जवळपास चार महिने पिंड पाण्यात असते. शेंडी भंडारदऱ्यापासून २० किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. शिवकालीन त्रिंबक प्रांतातील हे त्रिंबकेश्वर मंदिरासारखे प्रचिन मंदिर असून येथील पुष्कर्णी शिल्पकलेचा चांगला नमुना आहे. रतनवाडी, घाटघर, साम्रद, उडदावणे, पांजरे या भंडारदरा धरण पाणलोटातील रिंग रोड परिसरातील न्हानी फाॅल, गायमुख, नेकलेस, गिरणाई आदि धबधब्यांचे पाणी अंगावर घेत चिंब होतानाचा आनंद पर्यटक घेत असून पर्यटकांची रेलचेल वाढली आहे. आदिवासी भागात भात आवणीची कामे शेवटच्या टप्प्यात असून श्रावणातील प्रत्येक सोमवारी शेती कामास ‘मोढा’ पाळण्याची प्रथा आहे.
फोटो - २२अमृतेश्वर