कार्यकर्त्याची दादागिरी, खासगी जागेत पक्ष कार्यालय सुरू; व्यावसायिक हवालदिल
By शिवाजी पवार | Updated: December 18, 2023 13:03 IST2023-12-18T13:03:26+5:302023-12-18T13:03:45+5:30
जिल्हा पोलिस प्रमुखांकडे याचना, व्यावसायिक सुरडकर यांनी टपरी व बांधकाम काढण्यास सांगितले. मात्र, संबंधित कार्यकर्त्याने जिवे मारण्याची धमकी दिली, असे सुरडकर यांचे म्हणणे आहे.

कार्यकर्त्याची दादागिरी, खासगी जागेत पक्ष कार्यालय सुरू; व्यावसायिक हवालदिल
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : शहरातील एका व्यावसायिकाच्या जागेत कार्यकर्त्याने पत्र्याच्या टपरीतून राजकीय पक्षाचे कार्यालय थाटले आहे. कार्यकर्त्याने जिवे मारण्याची धमकी व ॲट्राॅसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचे व्यावसायिकाचे म्हणणे आहे. याप्रकरणी व्यावसायिकाने जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओला यांना निवेदन दिले आहे.
श्रीरामपूर शहरातील मुख्य रस्त्यावरील जुन्या पोस्ट गल्लीत छाया सुरडकर व त्यांच्या मुलांचे दुकान आहे. ते त्यांच्या उपजीविकेचे साधन आहे. दुकानाच्या मागील भिंतीस सद्य:स्थितीत खिडकी आहे. तेथे दरवाजा व जिना काढण्यासाठी सुरडकर यांनी काही मोकळी जागा सोडली होती. या जागेवर कार्यकर्त्याने १५ नोव्हेंबरला रात्रीतून पत्र्याची टपरी आणून ठेवली. त्याच्या भोवती पक्के बांधकाम केले.
व्यावसायिक सुरडकर यांनी टपरी व बांधकाम काढण्यास सांगितले. मात्र, संबंधित कार्यकर्त्याने जिवे मारण्याची धमकी दिली, असे सुरडकर यांचे म्हणणे आहे. अतिक्रमण काढण्यासंदर्भात १६ नोव्हेंबरला नगरपालिकेत व शहर पोलिस ठाण्यात अर्ज दिला. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नाही. आपल्या जीवितास धोका आहे. दहशतीखाली जगत आहोत. बेकायदेशीर टपरी व तेथील बांधकाम तत्काळ हटविण्यात यावे, अशी सुरडकर कुटुंबीयांची मागणी आहे. जिल्हा पोलिस प्रमुख ओला हे शहर पोलिस ठाण्यात आले होते. यावेळी सुरडकर यांनी त्यांची भेट घेतली. त्यानंतर ओला यांनी उपअधीक्षक डाॅ. बसवराज शिवपुजे यांना प्रकरणात लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या.