पंचवीस वर्षांच्या संघर्षाला पूर्णविराम; तृतीय पंथीयांच्या दफनभूमीसाठी मिळाली जागा
By अरुण वाघमोडे | Published: December 9, 2023 12:27 AM2023-12-09T00:27:26+5:302023-12-09T00:29:20+5:30
यावेळी उपस्थित तृतीयपंथी बांधवांनी समाधन व्यक्त करत प्रशासनाचे आभार मानले.
अहमदनगर: गेल्या पंचवीस वर्षांच्या संघर्षानंतर अखेर तृतीय पंथीयांच्या दफनभूमीसाठी नगर शहरातील सावेडी उपनगरातील बंद पडलेल्या कचरा डेपोतील पंधरा गुंठे जागा महापालिकेने दिली आहे. शुक्रवारी महापौर रोहिणी शेंडगे यांनी तृतीयपंथी संघटनेच्या अध्यक्ष काजल गुुरु यांना जागा देणेबाबतच्या ठरावाची प्रत सुपूर्द केले. यावेळी उपस्थित तृतीयपंथी बांधवांनी समाधन व्यक्त करत प्रशासनाचे आभार मानले.
शहरात तृतीयपंथीयांच्या अंत्यसंस्कारासाठी जागा मिळावी, यासाठी काजल गुुरु या गेल्या २५ वर्षांपासून संघर्ष करत होत्या. मनपा प्रशासनाला निवेदने, आंदोलने व अनेकवेळा पत्रव्यवहार करूनही त्यांच्या जागेचा प्रश्न मार्गी लागत नव्हता. दरम्यान याबाबत जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्याकडे व्यथा मांडल्यानंतर त्यांनी जागा उपलब्ध करून देणेबात मनपा प्रशासनाला आदेश दिले होते.
दरम्यान जागेसंदर्भात महासभेत ठराव संमत झाल्यानंतर पुढील प्रक्रिया होऊन जागा देण्याचे निश्चित झाले. मनपा प्रशासनाच्यावतीने सोमवारी तृतीयपंथीयांना सदची जागा माेजून दिली जाणार असल्याचे काजल गुरु यांनी सांगितले. यावेळी महिला बालकल्याण समितीच्या सभापती पुष्पा बोरुडे, नगरसेवक दत्ता कावरे, माजी नगरसेवक संभाजी कदम आदी उपस्थित होते.