प्राथमिक शाळेत भरला ‘आनंद बाजार’; विद्यार्थ्यांनी केली ५० हजाराची कमाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 05:05 PM2017-10-16T17:05:46+5:302017-10-16T17:15:43+5:30
विद्यार्थ्यांनी आकाशकंदील, दीपावलीसाठीच्या आवश्यक वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या. खाऊगल्लीत तर विद्यार्थ्यांनी पालकांच्या मदतीने समोसे, वडापाव, भजेपाव, ढोकळा, इडली सांबर, गुलाबजाम, भेळ यासह मटकी, मूग यापासून बनविलेले खाद्यपदार्थ घेण्यासाठी गर्दी झाली होती. अवघ्या दोन तासात बाजारात ५० हजारांची उलाढाल झाली.
केडगाव : नगर तालुक्यातील हिवरेबाजार येथील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी चक्क गुलाबजाम, इडली सांगर, ढोकळा, भजे, वडा, समोसे, भेळ असे विविध पदार्थ तयार करुन ‘आनंद बाजार’ भरविला. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी आकाशकंदील व इतर दिवाळीसाठी लागणा-या वस्तूही तयार करुन विकण्याचा आनंद लुटला. विशेष म्हणजे या आनंद बाजारात अवघ्या दोन तासात सुमारे ५० हजार रुपयांची उलाढाल झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आनंदाला उधाण आल्याचे चित्र शाळेत दिसले.
प्रत्येक शाळेत कृतीशील शिक्षण देणारे उपक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव द्यावेत, असे मत जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांनी हिवरेबाजार प्राथमिक शाळेत आयोजित ‘आनंद बाजार’च्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले. यावेळी आदर्शगाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, गटशिक्षणाधिकारी रवींद्र कापरे, वरिष्ठ भूवैज्ञानिक ऋषीराज गोस्की, केंद्रप्रमुख उत्तम भोसले, ग्रामपंचायत सदस्य रो. ना. पादिर, एस. टी. पादिर, रामभाऊ चत्तर, वसंत कर्डिले, मुख्याध्यापक तुकाराम थिटे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
गेल्या सात वर्षांपासून शाळेत ‘आनंद बाजार’चे आयोजन केले जात असून पहिल्या बाजारचा मी साक्षीदार आहे. विद्यार्थ्यांमध्ये तितकाच उत्साह आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच त्याचे उपयोजन कसे करायचे याचे ज्ञान असणे आवश्यक आहे व यासाठी असे उपक्रम फार महत्वाचे असल्याचे ते म्हणाले.
गटशिक्षणाधिकारी रवींद्र कापरे म्हणाले की, हिवरेबाजार हे इतरांना दिशा देणारे गाव असून शाळेतील उपक्रम हे इतर शाळांना मार्गदर्शक आहेत. शाळेतील उपक्रमांत सातत्य असल्यामुळे विद्यार्थ्यांना निश्चितच याचा फायदा होईल. पोपटराव पवार यांनी विद्यार्थ्यांमध्ये नवनवीन प्रयोग करण्याची क्षमता निर्माण करून भविष्यात कणखर व निर्णयक्षम नागरिक घडविण्यासाठी, असे उपक्रम राबविले जावेत असे सांगितले. नोकरीच्या मागे न पळता नोकरी निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व घडविले जावेत व त्यासाठी विद्यार्थ्यांना निरनिराळ्या संकल्पना, प्रयोग, उपक्रम राबवून शिक्षण दिले गेले पाहिजे. असे व्यवहारज्ञान बालवयातच मिळाल्यास भविष्यात विद्यार्थ्यांना कुठलीही अडचण राहणार नाही, असे त्यांनी सांगितले.
बाजारात विद्यार्थ्यांनी स्वत:च्या घरच्या भाजीपाल्यासह तयार केलेले आकाशकंदील, दीपावलीसाठीच्या आवश्यक वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या. खाऊगल्लीत तर विद्यार्थ्यांनी पालकांच्या मदतीने समोसे, वडापाव, भजेपाव, ढोकळा, इडली सांबर, गुलाबजाम, भेळ यासह मटकी, मूग यापासून बनविलेले खाद्यपदार्थ घेण्यासाठी गर्दी झाली होती. अवघ्या दोन तासात बाजारात ५० हजारांची उलाढाल झाली. खरेदीसाठी आसपासच्या गावातून ग्रामस्थ, पालक उपस्थित होते.
शिक्षक भाऊसाहेब ठाणगे यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर विजय ठाणगे यांनी प्रास्ताविक केले. रावसाहेब नांगरे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक सुभाष वाबळे, राजू शेख, शोभाताई ठाणगे, सुवर्णा ढवळे यांनी विशेष परिश्रम घेतले.