आनंदऋषीजी महाराज स्मृतिदिनाचे कार्यक्रम स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 12:22 PM2020-03-15T12:22:25+5:302020-03-15T12:24:05+5:30
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनानेही गर्दीचे कार्यक्रम टाळण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत जैन सोशल फेडरेशनने राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या पुण्यस्मृतीनिमित्त २८ मार्चपर्यंत होणारे कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
अहमदनगर : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनानेही गर्दीचे कार्यक्रम टाळण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत जैन सोशल फेडरेशनने राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या पुण्यस्मृतीनिमित्त २८ मार्चपर्यंत होणारे कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सर्वांच्याच आरोग्याची काळजी घेण्यासाठी साधू-साध्वीजींच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जैन श्रावक संघाचे अध्यक्ष हस्तीमल मुनोत यांनी दिली. जैन सोशल फेडरेशनतर्फे आचार्यश्रींच्या पुण्यस्मृतीनिमित्त आनंदधाम येथे भगवान महावीर व्याख्यानमाला, समूह भक्तीगीत स्पर्धा, २८ मार्चरोजीचा शांतीमार्च, भक्तीसंध्या हे सर्व कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमांसाठी दरवर्षी देशभरातून भाविक अहमदनगर शहरात येतात. त्यामुळे मोठी गर्दी होते. या काळात बाहेरगावहून आनंदधाम येथे येणाºया पदयात्राही रद्द करण्यात आल्या आहेत. आचार्यश्रींच्या पुण्यस्मृतीनिमित्त आनंदधाम येथे दररोज सकाळी होणारे प्रवचन, नवकार महामंत्र जाप सप्ताह तसेच २१ मार्च रोजी होणारा आयंबिल दिन हे कार्यक्रम नियोजित वेळेत होणार आहेत.