आनंदाश्रम स्वामी देवस्थानमुळे सुरेगाव बनले आध्यात्मिक केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 07:12 PM2020-02-22T19:12:44+5:302020-02-22T19:13:17+5:30

अध्यात्मिक गुरु प.पु.आनंदाश्रम स्वामींचे जन्मस्थान म्हणून पावन झालेल्या सुरेगावला आध्यात्मिक केंद्र म्हणून महत्त्व प्राप्त झाले आहे.

Anandasram Swami Devasthan became a spiritual center because of the security | आनंदाश्रम स्वामी देवस्थानमुळे सुरेगाव बनले आध्यात्मिक केंद्र

आनंदाश्रम स्वामी देवस्थानमुळे सुरेगाव बनले आध्यात्मिक केंद्र

अध्यामित्क - नानासाहेब जठार /
अध्यात्मिक गुरु प.पु.आनंदाश्रम स्वामींचे जन्मस्थान म्हणून पावन झालेल्या सुरेगावला आध्यात्मिक केंद्र म्हणून महत्त्व प्राप्त झाले आहे. आनंदाश्रम यांचे मूळ नाव श्रीधर नरहरी कुलकर्णी होते. त्यांचा जन्म १९१० साली श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगाव येथे कुलकर्णी घराण्यात झाला. त्यांना लहानपणापासून भजनाचा छंद होता. त्यांनी आध्यात्माचा ध्यास घेतला होता. ते मोठे झाल्यावर त्यांच्या आईने त्यांच्या लग्नाचा प्रयत्न सुरु केला. परंतु विवाह बंधनात अडकने त्यांना मान्य नव्हते. 
ईश्वर सेवा करण्याचा त्यांनी ध्यास घेतला होता. त्यामुळे त्यांनी लग्न न करता घर व गाव सोडण्याचा निर्णय घेतला. सुरेगावातून निघून ते तडक अलाहाबादला गेले. त्या ठिकाणी त्रिवेणी संगमावर त्यांनी तपश्चर्या केली. तपश्चर्या संपवून आल्यानंतर त्यांनी आळंदी येथे ज्ञानेश्वर महाराजांची सेवा सुरु केली. इंद्रायणी काठी कन्हैया आश्रमातून त्यांनी शिष्यांना आध्यात्माचे धडे द्यायला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी राज्यभर अनेक प्रवचने केली. नाना महाराज साखरे यांच्याकडून दीक्षा घेऊन पुढे कैवल्याश्रम स्वामी महाराज यांच्याकडून संन्यासाचा मार्ग स्वीकारला. नर्मदा नदीच्या तीरावर व्यास क्षेत्री संन्यास घेऊन गरुडेश्वराचे तीर्थस्थानी साधना केली. जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात त्यांचे गुरु कैवल्याश्रम यांच्या सांगण्यानुसार आनंदाश्रम स्वामींनी त्यांचे जन्मस्थान असलेल्या सुरेगाव येथे मोठ्या प्रमाणात भेटी दिल्या. 
मृत्यूपश्चात त्यांच्या जन्मगावी सुरेगाव येथेच समाधीस्थ होण्याची इच्छा होती. त्यानुसार त्यांनी त्याठिकाणी तशी व्यवस्था करुन ठेवली होती. अखेर ६ जून २००२ रोजी त्यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी आळंदी येथे देहावसान झाले. त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांची समाधी आळंदी येथेच तयार करावी असा अनेक भक्तांचा आग्रह होता. मात्र आनंदाश्रम स्वामींची इच्छा असल्याने सुरेगाव येथे त्यांची समाधी तयार करण्यात आली. आता मात्र सुरेगाव हे आनंदाश्रम स्वामींच्या समाधीमुळे आध्यात्मिक केंद्र बनले आहे. सध्या आनंदाश्रम स्वामींच्या समाधी स्थळाची पूजा अर्चा व सेवा त्यांचे वंशज हभप दिलीप काका कुलकर्णी  करीत आहेत. देवस्थानचे व्यवस्थापन संतोष शिंदे पाहत आहेत. आनंदाश्रम स्वामी देवस्थान समितीचे अध्यक्ष मनमोहनसिंग कोचर, कुकडी साखर कारखान्याचे संचालक अंकुश रोडे, सरपंच सर्जेराव रोडे, पोपटराव रोडे हे देवस्थानच्या कामकाजात नेहमी लक्ष  देत असतात. 

Web Title: Anandasram Swami Devasthan became a spiritual center because of the security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.