...अन् दिवस गोड जाहला : ३५ जणांना अनुकंपातून नोकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 02:55 PM2019-07-16T14:55:34+5:302019-07-16T14:55:39+5:30
गेल्या अनेक वर्षांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत ओशाळलेले चेहरे सोमवारी आनंदाने उजळून निघाले.
अहमदनगर : गेल्या अनेक वर्षांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत ओशाळलेले चेहरे सोमवारी आनंदाने उजळून निघाले़ आई-वडिलांच्या मृत्यूपश्चात घराची जबाबदारी आलेल्या ३५ जणांना सोमवारी जिल्हा परिषदेने नोकरीत सामावून घेतले़ अध्यक्षा शालिनी विखे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र हातात पडले अन् अनेक वर्षे वाट पहिलेला तो गोड दिवस हाच, अशा गोड प्रतिक्रियांनी गुंज धरला़
जिल्हा परिषदेत अनेक वर्षे सेवा केल्यानंतर सेवेत असताना वेगवेगळ्या कारणांनी मृत्यू ओढावलेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या पालकांना अनुकंपातून नोकरी दिली जाते़ जुलै २०१७ मध्ये विखे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ६५ जणांना अनुकंपातून जिल्हा परिषदेच्या सेवेत सामावून घेतले होते़ यावेळी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, सभापती उमेश परहर, सदस्य शरद झोडगे, अर्जुन शिरसाठ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, संजय कदम, प्रशांत शिर्के, डॉ़ संदीप सांगळे आदी उपस्थित होते़
२०१८ मध्ये अनुकंपा भरती झाली नव्हती़ अनुकंपातून नोकरी मिळावी, यासाठी अनेकजण प्रतीक्षेत होते़ अध्यक्षा शालिनी विखे यांनी पुन्हा अनुकंपातील जागा भरण्याबाबत आग्रही भूमिका मांडली़ त्यास काही सदस्यांनीही पाठिंबा दिला होता़ त्यामुळे प्रशासनाने अखेर अनुकंपा तत्वावरील भरतीला मान्यता दिली़ लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्हा परिषद भरतीची जाहिरात निघाली़ मात्र, अद्याप ही भरती प्रक्रिया पुढे सरकली नाही़ त्यामुळे अनुकंपा भरतीही रेंगाळते की काय, अशी शंका निर्माण झाली होती़
अनुकंपा तत्वावर नोकरीत सामावून घेण्यासाठी १४० जणांनी अर्ज केले होते़ शैक्षणिक पात्रतेनुसार ३५ जणांचा सेवेत समावेश करुन घेतला आहे़ यामध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिका १, वरिष्ठ सहायक लिपिक १, वरिष्ठ सहायक लेखा २, शिक्षणसेवक १०, पुरुष आरोग्य सेवक १०, महिला आरोग्य सेवक १, ग्रामसेवक ३, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक ४, औषध निर्माण अधिकारी २, पशुधन पर्यवेक्षक १ याप्रमाणे पदनिहाय नियुक्त्या देण्यात आल्या आहेत, अशी माहिती प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी दिली़