... तर राणेंविरोधात अपक्षही लढणार

By Admin | Published: May 23, 2014 01:18 AM2014-05-23T01:18:23+5:302014-05-23T01:27:41+5:30

शिर्डी : निलेश राणेंच्या पराभवात महत्वाची भूमिका बजावणारे आमदार दीपक केसरकर शिवसेनेत जाण्याची चर्चा असतानाच केसरकर यांनी मात्र राणेंविरोधात अपक्ष लढण्याचे संकेत दिले़

... and fight against the Rane | ... तर राणेंविरोधात अपक्षही लढणार

... तर राणेंविरोधात अपक्षही लढणार

 शिर्डी : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सिंधुदुर्गमध्ये निलेश राणेंच्या पराभवात महत्वाची भूमिका बजावणारे सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर शिवसेनेत जाण्याची चर्चा असतानाच केसरकर यांनी मात्र राणेंविरोधात अपक्ष लढण्याचे संकेत दिले़ राणेंनी सावंतवाडीतून उमेदवारी करावी, आपण त्यांच्या विरोधात अपक्ष लढू, असे प्रतिआव्हान केसरकर यांनी राणे यांना दिले़ गुरूवारी केसरकरांनी शिर्डीत साईदर्शन घेतले़ यावेळी त्यांच्या सोबत दिगंबर सुखी, श्रृतीका सुखी, उत्तरा कानेकर, निधी कानेकर आदींची उपस्थिती होती़ सावंतवाडीत आपले डिपॉझिट जप्त करण्याचे आव्हान राणे यांनी दिले आहे़ त्यांनी ही जागा राष्ट्रवादीकडून काँग्रेसला घ्यावी व उमेदवारी करावी आपण त्यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवू, असे प्रतिआव्हान केसरकरांनी राणे यांना दिले़ आपला लढा राणेंच्या नव्हे तर एका प्रवृत्तीच्या विरोधात असल्याने आपल्याला सर्वच पक्ष मदत करतील, असा विश्वास व्यक्त करतानाच विधानसभेला मतदार व्यक्ती व काम पाहून मतदान करत असल्याने अपक्षही मोठ्या संख्येने निवडून येतात, अशी पुष्टीही त्यांनी जोडली़ सेनेत येण्याविषयी आपल्यावर कोणताही दबाव नाही, असे स्पष्ट करतानाच उद्धव ठाकरेंशी केवळ अभिनंदनापुरते बोलणे झाले, मात्र ठाकरेंनी कोणत्याही निर्णयात आपल्याबरोबर राहण्याचे आश्वासन दिले. राजकारणात यासाठी मोठं मन लागतं, असेही केसरकर यांनी सांगितले़ गोव्यापेक्षाही कोकणात पर्यटन वाढीला मोठी संधी आहे़ येथील समुद्रकिनारे, हिरवीगार पर्वतराजी, हार्वेस्टींग व मुख्य म्हणजे गड, किल्ल्यांच्या रुपाने पुरातन वारसा या येथील जमेच्या बाजू आहेत़ संधी मिळाली तर कोकणवासीयांना विश्वासात घेऊन गोव्याच्या धर्तीवर पर्यटन विकासासाठी आपला प्रयत्न राहील, असेही ते म्हणाले. उद्योगमंत्री असलेल्या राणेंच्या जिल्ह्यातील कुडाळ एमआयडीसीतील ऐंशी टक्के उद्योग बंद आहेत, त्यांनी कधी कोकणात उद्योगधंदे व रोजगार वाढीसाठी प्रयत्न केले नाहीत व आम्हालाही आमदारकीच्या माध्यमातून काही करु दिले नाही, असा आरोपही केसरकरांनी केला़ आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीची कामगिरी चांगली राहील, मात्र त्यांना त्यासाठी कष्ट करावे लागतील असे मतही त्यांनी व्यक्त केले़ राजीनामा मंजूर होईपर्यंत आपण राष्ट्रवादीतच आहोत. उद्या मुंबईत अजित पवारांना भेटणार आहे़ त्यांच्याशी दीर्घकाळाचे व जिव्हाळ्याचे संबंध आहेत़ मात्र राष्ट्रवादीच्या बैठकीला जाणार नसल्याचे केसरकरांनी स्पष्ट केले़ (वार्ताहर)

Web Title: ... and fight against the Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.