अंगणवाडीच्या मुलांची शाळा भरतेय झाडाखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 03:35 PM2019-11-09T15:35:40+5:302019-11-09T15:36:39+5:30
वाळूंज शिवारातील पारधी वस्तीची मात्र परवड आहे. या वस्तीच्या अंगणवाडीसाठी इमारत मंजूर आहे. मात्र, वर्षानुवर्षे हे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने उन, पावसात या मुलांची झाडाखाली अंगणवाडी भरत आहे.
अहमदनगर : आदिवासी समाजासाठी मोठ्या प्रमाणावर निधी असतानाही वाळूंज शिवारातील पारधी वस्तीची मात्र परवड आहे. या वस्तीच्या अंगणवाडीसाठी इमारत मंजूर आहे. मात्र, वर्षानुवर्षे हे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने उन, पावसात या मुलांची झाडाखाली अंगणवाडी भरत आहे. महिला बालविकास विभागाचे स्थानिक अधिकारीही या अंगणवाडीकडे फिरकत नाहीत.
वाळुंज-नारायणडोहो शिवारात पारधी समाजाची ३० ते ४० कुटुंबांची वस्ती आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा समाज येथे वास्तव्य करत आहे. परंतु शासनाचे या समाजाकडे कायमच दुर्लक्ष झालेले आहे. येथे ६० ते ६५ मुले अंगणवाडीत येतात. अंगणवाडीच्या इमारतीचे काम १० वर्षांपूर्वी सुरू झाले होते. परंतु केवळ भिंती उभा केल्या गेल्या. त्यावर अद्याप छत पडलेले नाही. इमारतीसाठीचा निधी कोठे गेला? हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे ही सर्व मुले पालाबाहेर एका झाडाखाली वर्षानुवर्षांपासून उघड्यावर अंगणवाडीत येतात. अंगणवाडीच उघड्यावर म्हटल्यावर मुलांसाठीचा आहार कोठे शिजवायचा हाही मोठा प्रश्न. त्यामुळे येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस आपल्या घरून आहार शिजवून तो दुचाकीवर पारधी वस्तीपर्यंत आणतात. वस्तीवर आल्यावर मुलांना गोळा केले जाते. मग एका झाडाखाली ही अंगणवाडी भरते. महिला बालकल्याण विभागाचे स्थानिक प्रकल्प अधिकारी या अंगणवाडीला नियमित भेटी देतात का? ते भेट देत असतील तर इमारत अपूर्ण कशी? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या बांधकामाच्या निधीत अपहार झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नगर तालुक्यात किती गावांत अंगणवाडयांची दुरवस्था आहे, असाही प्रश्न समोर आला आहे.