अंगणवाडी कर्मचारी सभा, कामगार संघटना २६ नोव्हेंबरच्या संपात सहभागी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 11:42 AM2020-11-22T11:42:32+5:302020-11-22T11:43:59+5:30
राज्यातील अंगणवाडी कर्मचारी सभा, कामगार संघटनांनी पुकारलेल्या २६ नोव्हेंबरच्या देशव्यापी सार्वत्रिक संपात सहभागी होणार असल्याची माहिती अंगणवाडी कर्मचारी सभेच्या राज्य अध्यक्षा ॲड. निशा शिवूरकर यांनी दिली.
अकोले: राज्यातील अंगणवाडी कर्मचारी सभा कामगार संघटनांनी पुकारलेल्या २६ नोव्हेंबरच्या देशव्यापी सार्वत्रिक संपात सहभागी होणार असल्याची माहिती अंगणवाडी कर्मचारी सभेच्या राज्य अध्यक्षा वकील निशा शिवूरकर यांनी दिली. अंगणवाड्या बंद ठेवून सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी या संपात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अध्यक्षा सत्यभामा थिटमे, उपाध्यक्ष भारती धरत, सरचिटणीस शांताराम गोसावी, रेखा अवसरकर, पूजा घाटकर, इंदुमती घुले, लतिका शेळके, सुनंदा राहणे, नारंगाबाई ढोकरे, बेबी हरनामे, सुनंदा कदम, कल्याणी देशमुख, सीमा गायकर, क्रांती गायकवाड आदींनी केले आहे. केंद्र सरकारने नुकतेच कामगारांना संरक्षण करणारे कायदे रद्द केले आहेत. कंत्राटीकरणाला सरकारचे प्रोत्साहन आहे. बीएसएनएल, रेल्वे, विमान यासारखे सार्वजनिक उद्योग खाजगी भांडवलदारांना विकले जात आहेत. केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यामुळे शेती व शेतकरी संकटात सापडले आहेत. सरकारच्या या धोरणांमुळे देशातील कष्टकरी समूहांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. देशातील संयुक्त कामगार संघटना कृतीसमितीच्या वतीने २६ नोव्हेंबर २०२० रोजी सरकारच्या धोरणांविरुद्ध सार्वत्रिक संप पुकारला आहे. या आंदोलनात महाराष्ट्रातील लाखो अंगणवाडी कर्मचारी सहभागी होणार आहेत, अशी माहिती शिवूरकर यांनी दिली. केंद्र व राज्य सरकारकडे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा मिळावा, रिक्त जागांवर त्वरित भरती करावी, समान कामाला समान दाम या तत्वप्रमाणे मिनी अंगणवाडी सेविकांना पूर्ण अंगणवाडी सेविकांइतके मानधन द्यावे, सर्व विमा योजनांचे त्वरित लाभ मिळावेत, मोबाईल कामाचा विशेष भत्ता मिळावा, सर्व क्षेत्रातील कंत्राटी कामे बंद करून कायमस्वरूपी कामगार नेमावेत, आदी मागण्या करण्यात येणार आहेत. |