शिक्षकाकडून अंगणवाडी सेविकेची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 12:17 PM2018-07-31T12:17:34+5:302018-07-31T12:17:42+5:30
महसूल खात्यात नोकरीस लावण्याचे आमिष दाखवून अंगणवाडी सेविकेस प्राथमिक शिक्षक व पाटबंधारे कर्मचाऱ्याने साडेतीन लाख रुपयांना गंडविले. तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.
नेवासा : महसूल खात्यात नोकरीस लावण्याचे आमिष दाखवून अंगणवाडी सेविकेस प्राथमिक शिक्षक व पाटबंधारे कर्मचाऱ्याने साडेतीन लाख रुपयांना गंडविले. तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.
सुलतानपूर येथील अंगणवाडी सेविका सुनीता राजेंद्र देशमुख यांनी याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार २०१५ मध्ये संजय सोन्याबापू आगळे व त्यांची पत्नी जनाबाई संजय आगळे (रा. नेवासा फाटा) यांनी पढेगाव येथील अनिल यादव रोकडे, अप्पासाहेब रामचंद्र देसाई व नितीन रामचंद्र देसाई (रा. वडाळा महादेव, ता.श्रीरामपूर) यांची मंत्रालयात ओळख असल्याने सुशिक्षित बेरोजगार महिलांना पैशाच्या मोबदल्यात ते सरकारी नोकरी लावून देत असल्याचे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून जवळ पैसे नसताना ही सरकारी नोकरीच्या आशेने मेहुणे संतोष पवार व भाऊ सागर देशमुख यांच्याकडून प्रत्येकी एक-एक लाख असे दोन लाख रुपये आणून या पाच जणांना जुलै २०१५ मध्ये दिले.
१८ आॅगस्ट २०१५ रोजी त्यांनी महाराष्ट्र राज्य महसूल विभागांतर्गत सरळ सेवाभरतीत वरिष्ठ लिपिक म्हणून महिला राखीव प्रवर्गातील पद भरण्यासाठी निवड झाल्याचे नियुक्तिपत्र मिळाले. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात चौकशी केली असता अशा प्रकारची कोणतीही नेमणूक झाली नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांनी या आरोपींकडे चौकशी केली. उर्वरित दीड लाख रुपये मिळाल्यानंतर आयुक्त कार्यालयातून पत्र मिळेल, असे सांगितल्याने भावाकडून दीड लाख रुपये घेऊन आरोपींना दिले. त्यावर त्यांनी आयुक्तांचे नेमणूक पत्रही दिले. या पत्रात लिपिक पदावर नेमणूक झाल्याचे नमूद केले होते. पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्यावर हे पत्र ही बनावट असून, फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याबाबतीत उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर १२ फेब्रुवारी २०१८ रोजी अनिल रोकडे याने दिलेला साडेतीन लाख रुपयांचा धनादेश न वटता परत आला. जास्त तगादा केल्यावर १३ फेब्रुवारी २०१८ ला या पाच ही आरोपींनी सुलतानपूर येथे येऊन एक छदामही देणार नाही व कायद्याकडे धाव घेतल्यास तुला व मुलीला जीवे मारू, अशी धमकी ही दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
आरोपींना २ आॅगस्टपर्यंत कोठडी
मुख्य आरोपी जिल्हा परिषद शिक्षक संजय आगळे रा.नेवासा फाटा व लोणी पाटबंधारे कार्यालयातील अनिल रोकडे (रा.वडाळा महादेव ता.श्रीरामपूर) यांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयाने २ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.