नेवासा येथे अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:52 AM2021-01-13T04:52:43+5:302021-01-13T04:52:43+5:30

नेवासा : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीनंतर देण्यात येणारा एकरकमी लाभ हा तुटपुंजा आहे. त्यातून कर्मचाऱ्यांचा उदरनिर्वाह होणे शक्य नाही. ...

Anganwadi workers' agitation in Nevasa | नेवासा येथे अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

नेवासा येथे अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

नेवासा : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीनंतर देण्यात येणारा एकरकमी लाभ हा तुटपुंजा आहे. त्यातून कर्मचाऱ्यांचा उदरनिर्वाह होणे शक्य नाही. त्यामुळे एकरकमी लाभाबरोबरच दरमहा पेन्शन मिळावी, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीच्या नेतृत्वाखाली राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा अंगणवाडी सेविका, मदतनीस, कर्मचारी युनियनच्या वतीने नेवासा पंचायत समितीमधील एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या प्रकल्प कार्यालयावर निदर्शने करून निवेदन देण्यात आले.

यावेळी युनियनचे सरचिटणीस कॉ. राजेंद्र बावके म्हणाले, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीतर्फे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीनंतर दरमहा पेन्शन योजना लागू करण्याबाबतचा प्रस्ताव सादर केलेला आहे. या प्रस्तावानुसार पेन्शन योजना लागू करावी ही मागणी संघटनेने गेले अनेक वर्षांपासून शासनाकडे केलेली आहे. शासनाने त्याबाबत सकारात्मक आश्वासने देऊनही काहीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर तालुका प्रकल्प स्तरावर आंदोलने केली जात आहे. सरकारने याबाबत निर्णय घेऊन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनावर तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला.

यावेळी युनियन अध्यक्षा मदिना शेख, सहचिटणीस कॉ. जीवन सुरुडे, माया जाजू यांची भाषणे झाली. विविध मागण्यांचे निवेदन एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे कार्यालयीन प्रमुख जयश्री जाधव यांना देण्यात आले.

यावेळी अंगणवाडी सेविका सविता दरंदले, कावेरी शिंदे, चंद्रकला विटेकर, अलका दरंदले, बेबी आदमाने, शरिफा शेख, शांता कोरडे, मंगल मिसाळ, सुषमा सोनवणे, हीरा कदम, सुनीता बोरुडे, सुशीला गायकवाड, अनिता गवळी, रंजना मारकळी, मनीषा बेलदार, अलका तांदळे, आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

फोटो : ११ नेवासा आंदोलन

नेवासा येथे अंगणवाडी सेविकांनी सोमवारी आंदोलन केले.

Web Title: Anganwadi workers' agitation in Nevasa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.