कोरोना उपाययोजनातील सर्व कामांचा भार अंगणवाडी सेविकांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 10:39 PM2020-05-09T22:39:12+5:302020-05-09T22:40:01+5:30

कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने विविध सरकारी कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांना घरबसल्या काम करण्याची मुभा आहे. दुसरीकडे गावपातळीवर अल्प मानधनावर काम करणा-या अंगणवाडी सेविकांवर मात्र विविध जबाबदा-या टाकण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे सर्व अंगणवाड्या बंद आहेत. मात्र, असे असतानाही अंगणवाडी सेविकांवर प्रचंड कामाचा ताण येऊन पडला आहे.

Anganwadi workers are in charge of all the work in the Corona solution | कोरोना उपाययोजनातील सर्व कामांचा भार अंगणवाडी सेविकांवर

कोरोना उपाययोजनातील सर्व कामांचा भार अंगणवाडी सेविकांवर

अहमदनगर : कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने विविध सरकारी कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांना घरबसल्या काम करण्याची मुभा आहे. दुसरीकडे गावपातळीवर अल्प मानधनावर काम करणा-या अंगणवाडी सेविकांवर मात्र विविध जबाबदा-या टाकण्यात आल्या आहेत.
कोरोनामुळे सर्व अंगणवाड्या बंद आहेत. मात्र, असे असतानाही अंगणवाडी सेविकांवर प्रचंड कामाचा ताण येऊन पडला आहे. अंगणवाडीतील जे लाभार्थी आहेत त्यांना घरपोहोच आहार पुरविण्याची जबाबदारी सेविका व मदतनीस यांचेवर टाकण्यात आली आहे. परगावहून जे नागरिक गावात सध्या स्थलांतरित झाले आहेत त्या सर्व नागरिकांची नोंद सेविकांनी ठेवायची आहे. या नागरिकांसोबत तीन ते सहा वयाची मुले असतील तर त्यांचीही नोंद ठेऊन त्यांना घरपोहोच आहार द्यावयाचा आहे.
ताप, सर्दी, खोकला ही लक्षणे असणारे (सारी) रुग्ण गावात आहेत का? हे तपासण्यासाठी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस व आशा सेविका यांनी आजपर्यंत गावात तीन वेळा सर्वे केला आहे. सध्या गावांमधील शाळांमध्ये अनेक नागरिक क्वारंटाईन करुन ठेवले आहेत. या नागरिकांची सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत देखभाल करण्याची जबाबदारीही बहुतांश गावात अंगणवाडी सेविकांवर टाकण्यात आली आहे.
अंगणवाडी सेविकांना सध्या मासिक आठ हजार, तर मदतनीस यांना पाच हजार रुपये मानधन मिळते. मात्र अल्प मानधन असतानाही गावपातळीवरील सर्व कामे त्यांचेवर सोपविण्यात आली आहेत. अनेक ठिकाणी सेविका व मदतनीस यांना साधे मास्क व सॅनिटायझर देखील देण्यात आलेले नाही. वरिष्ठ सरकारी अधिकारीही या कामाची दखल घेताना दिसत नाहीत. नियमित पगार घेणाºया इतर सरकारी कर्मचा-यांवर ही कामे सोपविण्यापेक्षा प्रशासनाने सेविकांवर कामे सोपविण्याचा सपाटा लावला आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांवर काही कामे सोपविण्यात आली आहेत. मात्र त्यासाठी निवडक शिक्षक आहेत.

अंगणवाडी सेविकांवर सध्या अनेक कामे सोपविण्यात आली आहेत. यात या महिलांच्या आरोग्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. कोरोना ही जागतिक आपत्ती आहे. या आपत्तीत अंगणवाडी सेविका आपली जबाबदारी नक्कीच निभावतील. मात्र केवळ त्यांचेवर कामे न सोपविता गावपातळीवर काम करणारे ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक व इतरही विभागाच्या सरकारी कर्मचाºयांवर समप्रमाणात व सक्तीने ही कामे सोपवली जाणे आवश्यक आहे. काही कर्मचारी दिवसरात्र कामात व काहींवर काहीच जबाबदारी नाही हे धोरण अन्यायकारक आहे.
- अ‍ॅड. निशाताई शिवूरकर, राज्य अध्यक्ष, अंगणवाडी कर्मचारी सभा

अंगणवाडी सेविका व आशा सेविका यांच्यावर कोरोनाच्या आपत्तीत प्रचंड कामे लादली मात्र, त्यांना आरोग्याबाबत काहीही सुविधा व संरक्षण शासनाने दिलेले नाही. आशा सेविकांना सध्या काहीही मानधन नाही. शासन अक्षरश: त्यांना फुकट राबवून घेत आहे. तरीही शासनाकडे आशेने डोळे लावून हे कर्मचारी काम करत आहेत. या बाबीचा शासन कधीतरी विचार करणार आहे का? नियमित सरकारी कर्मचाºयांवर जेवढी जबाबदारी नाही ती जबाबदारी बिनपगारी काम करणाºया आशा कर्मचाºयांवर टाकण्यात आली आहे. ही कुठली मानवता आहे ?
- काशिनाथ साबळे, जनशक्ती आशा व सुपरवायझर आरोग्य कर्मचारी संघटना

Web Title: Anganwadi workers are in charge of all the work in the Corona solution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.