अंगणवाडीताईंना मिळणार वाढीव मोबाइल भत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:20 AM2021-04-01T04:20:49+5:302021-04-01T04:20:49+5:30
केडगाव : संपूर्ण राज्यात अंगणवाडीचा कारभार ऑनलाइन करण्यात आला आहे. त्यानुसार अंगणवाडीसेविकांना स्मार्ट फोन देण्यात आले आहेत. मोबाइल रिचार्ज, ...
केडगाव : संपूर्ण राज्यात अंगणवाडीचा कारभार ऑनलाइन करण्यात आला आहे. त्यानुसार अंगणवाडीसेविकांना स्मार्ट फोन देण्यात आले आहेत. मोबाइल रिचार्ज, नेट पॅक मारण्यासाठी सेविकांना या अगोदर ४०० रुपयांचा भत्ता दिला जात होता. त्यात आता वाढ करत मार्चपासून ६०० रुपये भत्ता दिला जाणार आहे. त्यामुळे नगर तालुक्यातील २९१ जणींना याचा लाभ होणार आहे. यासाठी एक लाख ७४ हजार ६०० रुपयांची रक्कम लवकरच खात्यावर जमा होणार असल्याने अंगणवाडीताईंना दिलासा मिळाला आहे.
नगर तालुक्यात २९१ अंगणवाड्या आहेत. त्यामध्ये ११ हजार लाभार्थी आहेत. यामध्ये ० ते ६ वयोगट आठ हजार, गरोदर १४०० आणि स्तनदा १६०० आहेत. त्यांचा आहार वितरित करण्यापासून ते पूर्वप्राथमिक शिक्षण देण्याची जबाबदारी अंगणवाडीसेविकांवर आहे. अंगणवाडी कामकाजासाठी त्यांना दोन वर्षांपूर्वी मोबाइल फोन देण्यात आले आहेत. मोबाइल रिचार्ज, नेट पॅकसाठी तीन महिन्यांच्या अगोदर ४०० रुपयांप्रमाणे भत्ता दिला जात होता. महागाईमुळे हा भत्ता परवडणारा नव्हता. कित्येकदा नेट पॅक आणि रिचार्जसाठी खिशातील पैसे घालावे लागत असत. त्यामुळे अंगणवाडीताईंची वाढीव भत्त्यासाठी मागणी होती. राज्य महिला व बालकल्याण विभागाने दखल घेत २०० रुपये वाढ देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नगर तालुक्यातील २९१ जणींना मार्च ते मेपर्यंतच्या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी ६०० रुपयांप्रमाणे एक लाख ७४ हजार ६०० रुपये मिळणार आहेत.
---
यासाठी होतो मोबाइलचा वापर..
मोबाइलच्या माध्यमातून रोजचा आहार, बालकाची निरीक्षण, स्वाध्याय, हजेरी पट, बालकांचे वजन, गरोदर मातांचे वजन, महिलांच्या आरोग्य तपासणींची माहिती देणे, बाळंतपणाच्या तारखा दाखल करणे. लाभार्थींच्या घरी भेटी देणे, त्यांची माहिती भरणे आदी कामे करावी लागतात. सध्या अंगणवाड्या बंद असल्या तरीदेखील इतर कामांच्या नोंदी या मोबाइलवर देण्यात येत असल्याने कामाला गती आली आहे.
--
अंगणवाडीसेविकांना दोन वर्षांपूर्वी मोबाइल देऊन प्रशिक्षणही देण्यात आले. त्यासाठी ४०० रुपये महिन्याप्रमाणे रिचार्ज भत्ता देण्यात येतो. मात्र रिचार्जच्या दरात वाढ झाल्याने आता हा भत्ता वाढवून ६०० रुपये करण्यात आला आहे.
- रफिकअली सय्यद,
प्रकल्प अधिकारी, नगर
--
शासनाची माहिती संगणीकृत व ऑनलाइन भरण्यासाठी आम्हाला स्मार्टफोन देण्यात आले. मात्र त्याच्या वापराचे दर आम्हाला परवडत नव्हते. ते वाढवून मिळावे, अशी आमची मागणी होती. त्याप्रमाणे रिचार्जचा भत्ता ४०० रुपयांवरून ६०० रुपये करण्यात आला आहे.
- सविता निंबाळकर,
अंगणवाडीसेविका
--
नगर तालुक्यातील स्थिती..
अंगणवाडी संख्या- २९१, अंगणवाडीसेविका- २९१, मदतनीस- २४०, मिनीसेविका- ५१, लाभार्थी-
० ते ६ वयोगट- ८ हजार,
गरोदरमाता- १ हजार ४००, स्तनदा- १ हजार ६००.