संतप्त महिलांचा गटविकास अधिकाऱ्यांना घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2016 11:17 PM2016-05-16T23:17:13+5:302016-05-16T23:25:14+5:30
अहमदनगर : पिण्याच्या पाण्यासाठी संतप्त झालेल्या इमामपूरच्या सुमारे ३० ते ४० महिलांनी नगरच्या गटविकास अधिकारी रेश्मा होजगे यांना सोमवारी घेराव
जिल्हा परिषदेतील घटना : सलग दुसऱ्या आठवड्यात आंदोलन
अहमदनगर : पिण्याच्या पाण्यासाठी संतप्त झालेल्या इमामपूरच्या सुमारे ३० ते ४० महिलांनी नगरच्या गटविकास अधिकारी रेश्मा होजगे यांना सोमवारी घेराव घालत जिल्हा परिषदेत जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे जिल्हा परिषदेची प्रशासकीय इमारत दणाणून गेली.
इमापूरचे सरपंच, ग्रामसेवक यांच्या आडमुठ्या धोरणामुळे गावातील महिलांना एक किलोमीटर लांबवरून टँकरचे पाणी आणावे लागत आहे. गावात खासगी व्यक्तीने हौद बांधून तो ग्रामपंचायतीला दिला. मात्र, त्यात पाणी साठवण्याऐवजी एक किलोमीटरवर पाणी टाकण्यात येत आहे. या विरोधात तक्रार, आंदोलन करूनही उपयोग न झाल्याने सोमवारी दुपारी हा प्रकार मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या कार्यालयाबाहेर घडला. इमामपूर येथील ३० ते ४० महिला पाणीप्रश्न घेवून थेट जिल्हा परिषदेत आल्या. त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कार्यालय गाठले. त्या ठिकाणी या महिलांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, त्या ठिकाणी गटविकास अधिकारी होजगे आल्या. संतप्त झालेल्या महिलांनी आमच्या पाण्याची काय सोय लावली, असा सवाल करत होजगे यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला.
ही माहिती मिळताच सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव या ठिकाणी आले. त्यांनी संतप्त महिलांना शांत करत हा प्रश्न तातडीने सोडवण्याच्या सूचना होजगे यांना दिल्या. हा प्रकार साधारण अर्धा तास सुरू होता. महिलांच्या घोषणाबाजमुळे जिल्हा परिषदेची इमारत दणाणून गेली. गेल्या आठवड्यात या गावातील नागरिकांनी पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयात आंदोलन केले होते.
त्यावेळी हा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, त्यावर उपाययोजना करण्याऐवजी हा प्रश्न तसाच ठेवल्याने जिल्हा परिषदेत सोमवारी पुन्हा आंदोलन झाले. (प्रतिनिधी)