संतप्त शेतक-यांनी महावितरणच्या विसापूर उपकेंद्राला ठोकले टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 06:29 PM2018-10-10T18:29:57+5:302018-10-10T18:30:02+5:30
विजपुरवठा सुरळीत होत नसल्याने संतप्त शेतक-यांनी विसापूर (ता.श्रीगोंदा) येथील महावितरणच्या उपकेंद्राला आज दुपारी रोजी टाळे ठोकून निषेध केला. आंदोलनानंतर तात्काळ विजपुरवठा सुरू करण्यात आला.
विसापूर : विजपुरवठा सुरळीत होत नसल्याने संतप्त शेतक-यांनी विसापूर (ता.श्रीगोंदा) येथील महावितरणच्या उपकेंद्राला आज दुपारी रोजी टाळे ठोकून निषेध केला. आंदोलनानंतर तात्काळ विजपुरवठा सुरू करण्यात आला.
गेल्या आठवड्यापासून विसापूर उपकेंद्रातुन होणारा विजपुरवठा विस्कळीत झाला होता. सुरेगाव,उखलगाव व घुटेवाडीकडे जाणा-या विद्युत लाईन अत्यंत जुनाट झाल्यामुळे सतत तारा तुटणे व पोल पडण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील आठवड्यात वादळात अनेक पोल पडल्याने व तारा तुटल्याने विसापूर गाव व स्टेशनचा काही भाग चार दिवस अंधारात होता. विसापुर तलाव व मुंगुसगावचे लाईनवर लोड येत असल्याने विज पुरवठा सतत खंडीत होत आसल्याने सुरेगाव व मुंगुसगावचे शेतक-यांनी विसापूर उपकेंद्राला टाळे ठोकले. पाऊस नसल्यामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. जे पाणी उपलब्ध आहे त्यामध्ये शेतकरी आपली उभी असणा-या पिकांना वाचवण्याचा कसाबसा प्रयत्न करत आहेत. त्यात वारंवार होणा-या विजेची समस्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.
यावेळी कुकडी साखर कारखान्याचे संचालक अंकुश रोडे, सचिन जठार, तात्या भोसले उपस्थित होते. शेतक-यांशी महावितरणचे कनिष्ठ अभियंता दिपक सिंग यांनी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधून समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले.