माती आरोग्य सुधारले तरच पर्यावरण वाचेल-अनिल दुर्गुडे यांचे मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 12:42 PM2019-12-07T12:42:27+5:302019-12-07T12:43:18+5:30
२००२ मध्ये आंतरराष्ट्रीय युनियन मृदशास्त्र या संस्थेने थायलंडचे राजे एच़ एम़ भुमीबोल आदल्यादेज यांच्या पुढाकाराने त्यांचा जन्मदिवस ५ डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिन आयोजित करण्याचा प्रस्ताव देण्यात आला. डिसेंबर २०१३ रोजी युनायटेड नेशन जनरल असेम्ब्लीत ठराव करण्यात आला. मृदा दिनानिमित्त राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील मृदा शास्त्रज्ञ डॉ़अनिल दुरगुडे यांच्याशी केलेला संवाद...
जागतिक मृदा दिन विशेष
लोकमत मुलाखत - भाऊसाहेब येवले/
राहुरी : मातीचे बिघडलेले आरोग्य सुधारले तर पर्यावरण सुरक्षित राहील. त्या दृष्टिकोनातून २००२ मध्ये आंतरराष्ट्रीय युनियन मृदशास्त्र या संस्थेने थायलंडचे राजे एच़ एम़ भुमीबोल आदल्यादेज यांच्या पुढाकाराने त्यांचा जन्मदिवस ५ डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिन आयोजित करण्याचा प्रस्ताव देण्यात आला. डिसेंबर २०१३ रोजी युनायटेड नेशन जनरल असेम्ब्लीत ठराव करण्यात आला. मृदा दिनानिमित्त राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील मृदा शास्त्रज्ञ डॉ़अनिल दुरगुडे यांच्याशी केलेला संवाद...
प्रश्न : जमिनीचे आरोग्य कसे धोक्यात आले आहे ?
डॉ. दुरगुडे : नैसर्गिक संशोधनामध्ये माती ही पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाचा घटक आहे. देशात पाण्याव्दारे मातीची प्रति हेक्टरी १६ टन धूप होत आहे. वर्षाला ५़३ बिलीयन टन माती वाहून जाते़ त्याबरोबर ८ मिलियन टन अन्नद्रव्य वाहून जात़े. जलचर प्राण्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दुस-या बाजूला नदी व कॅनलच्या कडेला असलेल्या जमिनी खराब झाल्या आहेत. भारतात ७ मिलियन हेक्टर जमिनी क्षारपड झाल्या आहेत. धोक्यात आलेली मृदा वाचविण्यासाठी सर्वांगीण प्रयत्न करणे गरजेचे आहे.
प्रश्न : जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी माती परीक्षणाचे महत्व काय आहे?
डॉ़दुरगुडे : जमिनीचा कर्ब घसरल्याने ६५ टक्के उत्पादकता कमी झाली आहे. शेतक-यांनी माती तपासून घ्यावी. त्यानुसार खतांची मात्रा द्यावी. माती परीक्षणानुसार पाणी देण्याचे नियोजन करावे. आरोग्य पत्रिकेनुसार नियोजन केले तर जमिनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. पिकांची फेरपालट करावी़ ताग व धैंचासारख्या हिरवळीची खते करून ते जमिनीत गाडावे. त्यामुळे जमिनीची प्रत सुधारण्यास मदत होईल.
प्रश्न : जमिनीची धूप थांबविण्यासाठी काय करता येईल ?
डॉ.दुरगुडे : जमिनीची बांधबंदिस्ती, सपाटीकरण, मृदा व जल संधारणाचा वापर केल्यामुळे मातीची धूप कमी होईल. जलसाठ्यामध्ये वाढ होईल. मातीचा सामू ६़५ ते ७़५ इतका असावा. जसजसा जमिनीचा सामू वाढत जाईल. तसतसे जमिनीत टाकलेल्या रासायनिक खतांची कार्यक्षमता कमी होत जाते. माती परीक्षणानुसार जिप्सम हे शेणखतामध्ये मिसळून टाकावे.
प्रश्न : उसामुळे जमिनी नापीक होऊ लागल्या आहेत़. त्याबद्दल काय करता येईल?
डॉ. दुरगुडे : बागायती नदी व कॅनलच्या परिसरात पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. ऊस हे पीक ठिबकखाली घेतल्यास पाण्याची बचत होईल व जमिनीचा पोत सुधारून उत्पादकता वाढेल़.
प्रश्न : फळबागासंदर्भात काय करता येईल ?
डॉ. दुरगुडे : फळबागासाठी सेंद्रीय पिकांचा व प्लॅस्टीक मल्चींगचा वापर करावा. तणाला फुले येण्यापूर्वीच उपटून झाडांच्या बुंध्याभोवती मल्चींग म्हणून टाकाव्यात़. याशिवाय जिवाणू खतांचा वापर करावा. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा.