अनिल कवडे यांची बदली रद्द
By Admin | Published: May 1, 2016 01:38 AM2016-05-01T01:38:50+5:302016-05-01T01:40:09+5:30
अहमदनगर : जलयुक्त शिवारसारख्या योजनांमध्ये उत्कृष्ट काम करणारे जिल्हाधिकारी अनिल कवडे हेच नगरचे जिल्हाधिकारी राहणार आहेत.
अहमदनगर : जलयुक्त शिवारसारख्या योजनांमध्ये उत्कृष्ट काम करणारे जिल्हाधिकारी अनिल कवडे हेच नगरचे जिल्हाधिकारी राहणार आहेत. त्यांची बदली रद्द करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. याबाबतचे आदेश सोमवारी निघणार आहेत, अशी माहिती गृहराज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी कर्जत येथील एका कार्यक्रमात दिली आहे.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कर्जत शहरालगत कान्हुळा नदीवरील विठ्ठल कुंड येथे केटीवेअर नाला बांधमधील गाळ काढणे, खोलीकरण व सरळीकरण अंतर्गत केलेल्या कामात साठलेल्या पाण्याचे शनिवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात पालकमंत्र्यांनी वरील घोषणा केली. यावेळी जिल्हाधिकारी अनिल कवडे, कर्जतचे नगराध्यक्ष नामदेव राऊत, नगरसेवक, प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कर्जतचे नगराध्यध्यक्ष नामदेव राऊत म्हणाले, जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी जलयुक्त शिवार योजनेची मोठ्या प्रमाणावर कामे केली आहेत. सध्या दुष्काळ आहे. चांगले काम करणाऱ्या जिल्हाधिकारी कवडे यांची बदली करणे योग्य होणार नाही. याबाबत पालकमंत्र्यांनी लक्ष घालून कवडे यांची बदली रद्द करावी.
जाहीर कार्यक्रमात राऊत यांच्या मागणीबाबत पालकमंत्री शिंदे म्हणाले, कवडे यांनी जिल्ह्यात चांगले काम केले आहे. त्यांची झालेली बदली रद्द करण्याबाबत राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय यांच्याशी चर्चा केली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा केली. कवडे यांची बदली रद्द करण्यात येईल. याबाबत सोमवारी आदेश काढण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. पालकमंत्र्यांच्या या घोषणेमुळे कार्यक्रमात टाळ््यांचा कडकडाट झाला.
कुकडीच्या पाण्याबाबत शिंदे म्हणाले, निवडणुकीपूर्वी जनतेला पाणी आणण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे हक्काचे पाणी मिळविण्यात आपण यशस्वी झालो असून जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे. हक्काचे पाणी पोलीस संरक्षण घेवून मिळविले आहे.