अनिल राठोड यांनी पदोपदी निष्ठा विकली : अंबादास पंधाडे यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 02:07 PM2018-12-01T14:07:29+5:302018-12-01T14:07:38+5:30
शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी हिंदुत्त्वाचा फक्त मुखवटा लावला. मात्र आतमध्ये फक्त तडजोडीचे राजकारण करून स्वत:च्या निष्ठा विकल्या.
अहमदनगर : शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी हिंदुत्त्वाचा फक्त मुखवटा लावला. मात्र आतमध्ये फक्त तडजोडीचे राजकारण करून स्वत:च्या निष्ठा विकल्या. राठोड यांच्यामुळेच अरुण जगताप विधानपरिषदेवर निवडून गेले, तर संग्राम जगतापही पहिल्यांदा महापौर झाले. जगताप यांना राठोड यांनीच मोठे केले. छगन भुजबळांसोबत शिवसेना फुटल्यानंतर दुसऱ्या सहा फुटीर आमदारांमध्ये अनिल राठोड हे एक होते. त्यामुळे राठोड हेच खरे गद्दार आहेत, असा घणाघाती आरोप शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते अंबादास पंधाडे यांनी ‘लोकमत’कडे केला.
शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांची लोकमत फेसबुक पेजवर गुरुवारी लाईव्ह मुलाखत झाली. ती मुलाखत शुक्रवारच्या लोकमतमध्ये प्रसिद्ध झाली. या मुलाखती दरम्यान राठोड यांनी पंधाडे यांचा उल्लेख निष्ठावान कसले ते गद्दार आहेत. तसेच गरजा भागविण्यासाठी ते दुसरीकडे गेले, असा आरोप केला. या आरोपाचे पंधाडे यांनी शुक्रवारी ‘लोकमत’कडे खंडण केले.
पंधाडे म्हणाले, नागपूर अधिवेशनादरम्यान छगन भुजबळ यांनी शिवसेना फोडली. सेनेचे १८ आमदार भुजबळांसमवेत गेले. आणखी सहा आमदारांनीही भुजबळ यांच्यासोबत जाण्यासाठी तडजोडी केल्या. त्यामध्ये राठोड हे एक होते. मात्र ही बातमी फुटल्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्या सहा आमदारांना मातोश्रीवर बोलावून तंबी दिली. मात्र राठोड गद्दार निघाल्याने १९९६ मध्ये त्यांना सुरवातीला विधानसभेची उमेदवारी दिली नाही. त्याऐवजी गोपाळराव झोडगे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला. झोडगे हे त्यावेळी काँग्रेसचे होते. तसेच त्यांचे भुजबळांशी संबंध असल्याचे पुरावे ठाकरे यांना दिले. राठोड हे एकही पैसा न खाता काम करणारा, चांगला जनसंपर्क असणारा आमदार होता. त्यामुळे राठोड यांनाच उमेदवारी देण्यासाठी ठाकरे यांच्याकडे शिष्टाई केली. ठाकरे यांनी मलाही उमेदवारी देऊ केली होती. मात्र ती नम्रपणे नाकारली आणि राठोड यांच्यासाठीच उमेदवारी मागितली. निष्ठावान नसतो तर हे माझ्याकडून घडले असता का? राठोड यांनी सेनेशी गद्दारी केल्याचे ठाकरे यांच्या लक्षात आल्यानेच त्यांनी उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला होता, हेच खरे सत्य आहे.
पंधाडे म्हणाले, निष्ठावान असल्यानेच शिवसेनेत २५ ते ३० वर्षे टिकलो. मला कोणीही शिवसेनेतून काढलेले नाही आणि मी ही शिवसेना सोडलेली नाही. कोणत्याही पक्षातही प्रवेश केला नाही. फक्त राजकारणात आता सक्रिय नाही. २००८ मध्ये महापौर होण्याची इच्छा व्यक्त केली. सेनेकडे बहुमतही होते. मात्र दोन कोटी असतील तरच महापौर होता येईल,असे ते म्हणाले. सेनेशी २५ वर्षांपासून निष्ठा असणाºयांची राठोड यांनी अशी किंमत केली. त्यामुळेच त्यांची साथ सोडून दिली, मात्र शिवसेना सोडलेली नाही. त्यावेळी राठोड यांनीच काहींना राष्ट्रवादीत पाठविले, त्यामुळे संग्राम जगताप महापौर झाले. विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र पिपाडा यांचा पराभव झाला. सेनेशी १८ नगरसेवकांनी मतदान केल्यामुळेच जगताप आमदार झाले. त्यामुळे राठोड निष्ठावान की गद्दार ? हे सांगायची गरज नाही. अरुण जगताप यांना नगराध्यक्ष करण्यातही राठोड यांचाच सिंहाचा वाटा होता. राठोड हे ‘अॅडजेस्टमेंट’ बादशहा आहेत.
आमदार निधीही विकला
राठोड यांनी कोतकर, कर्डिले, जगताप यांच्यावर वैयक्तिक टीका कधीच केली नाही. तेवढी धमकही त्यांच्यात नव्हती. ते केवळ राजकीय टीका करायचे. माझ्याकडे निष्ठा नव्हती तर २५ वर्षे जवळ का केले? राठोड यांचा व्यवसाय काय? त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह कसा चालतो? हे त्यांनी सांगावे. राठोड यांनी १५ टक्क्यांनी आमदार निधीही विकला, असाही आरोप पंधाडे यांनी केला. त्याशिवाय त्यांचा चरितार्थ चालणेच शक्य नाही. राजकारण हाच त्यांचा खरा धंदा आहे. कार्यकर्त्यांना मोठे होऊ न देणे आणि नव्यांना झुलवत ठेवणे, खोटे बोलणे यात राठोड पटाईत आहेत.