अनिल राठोड यांचा रक्तदाब वाढला : जामीन अर्जावर आज सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 12:32 PM2019-08-03T12:32:05+5:302019-08-03T12:36:02+5:30
महापालिकेच्या अभियंत्यावर बूट फेकल्याप्रकरणी न्यायालयाने माजी आमदार अनिल राठोड यांचा जामीन फेटाळत त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली़
अहमदनगर : महापालिकेच्या अभियंत्यावर बूट फेकल्याप्रकरणी न्यायालयाने माजी आमदार अनिल राठोड यांचा जामीन फेटाळत त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली़ तेथे मात्र राठोड यांचा रक्तदाब आणि शुगर वाढल्याने त्यांना गुरुवारी रात्रीच जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले़ दरम्यान राठोड यांच्यावतीने जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यात आला असून, त्यावर शनिवारी सुनावणी आहे़
बोल्हेगाव फाटा येथील रस्त्याचे काम रखडल्याने शिवसेना नगरसेवकांनी मे महिन्यात मनपा आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्या दालनात आंदोलन केले होते. यावेळी अनिल राठोड हेही उपस्थित होते. आंदोलनादरम्यान शिवसेनेचा कार्यकर्ता मदन आढाव याने शहर अभियंता विलास सोनटक्के यांच्या दिशेने बूट भिरकावला होता. याप्रकरणी अभियंता सोनटक्के यांनी तोफखाना पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून राठोड यांच्यासह शिवसेना नगरसेवक, कार्यकर्ते अशा १५ ते २० जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यानच्या काळात राठोड यांच्या वतीने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज करण्यात आला होता, मात्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळला.
दरम्यान, गुरूवारी राठोड स्वत:हून तोफखाना पोलीस ठाण्यात हजर झाले. पोलिसांनी त्यांना न्यायालयात मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले. पोलिसांनी सखोल चौकशीसाठी राठोड यांना पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने राठोड यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर राठोड यांच्या वतीने लगेच जामिनासाठी अर्ज करण्यात आला. त्यास सरकारी वकील पी. ए. कुलकर्णी यांनी आक्षेप घेत या गुन्ह्याचा तपास होणे बाकी असल्याचे सांगितले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अर्ज फेटाळला. त्यामुळे राठोड यांची रवानगी उपकारागृहात (सबजेल)मध्ये करण्यात आली.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे राठोड यांना गुरुवारी रात्री जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत़ दरम्यान राठोड यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर शुक्रवारी दिवसभर तेथे कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती़