वरखेडच्या यात्रेत पशुहत्या, दारूबंदीचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 06:19 PM2018-04-05T18:19:39+5:302018-04-05T18:20:21+5:30
भेंडा : वरखेड (ता. नेवासा ) येथे ५ एप्रिलपासून सुरू होत असलेल्या महालक्ष्मी यात्रेत व नंतरही मंदिर परिसरात पशुहत्या ...
भेंडा : वरखेड (ता. नेवासा) येथे ५ एप्रिलपासून सुरू होत असलेल्या महालक्ष्मी यात्रेत व नंतरही मंदिर परिसरात पशुहत्या व अवैध दारु विक्रीला बंदी घालणारा आदेश धर्मदाय उपआयुक्त व नेवासा तहसीलदारांनी मंदिर विश्वस्त मंडळाला बजावला आहे.
यात्रेत सुमारे ३० ते ३५ हजार बोकड व कोंबड्या नवसापोटी कापल्या जातात. राज्यात पशुहत्या बंदी कायदा लागू असतानाही यात्रेत कायद्याचे उल्लंघन होते. पशुहत्या ही प्रथा अमानवीय व अनैसर्गिक आहे. पशुहत्या प्रथा ही पर्यावरण व बालकांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम करणारी आहे. यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यवाह अॅड. रंजना गवांदे, सल्लागार कॉ. बाबा आरगडे यांनी अहमदनगरचे जिल्हाधिकारी, धर्मदाय उपायुक्त व नेवाशाचे तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत धर्मदाय उपायुक्त व नेवासा तहसीलदारांनी वरखेड महालक्ष्मी मंदिर विश्वस्त मंडळाला पशुहत्या व अवैध दारु विक्री रोखण्यासाठी दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत.
आदेशात मंदिर विश्वस्त मंडळाने मंदिर परिसरात पशुहत्या व अवैध दारू विक्री होणार नाही, पशुहत्या बंदी कायद्याचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी, नागरिकांच्या सभा घेऊन त्यांना पशुहत्येपासून होणारे दुष्परिणाम सांगावे, गावात सार्वजनिक ठिकाणी व यात्रा परिसरात जनजागृती करणारे फलक लावावे, मंदिरात व मंदिर परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे व यात्रा कालावधीत ड्रोन कॅमेरा लावून चित्रीकरण करावे, वाहनावर ध्वनीक्षेपक लावून गावात व यात्रेत पशुहत्या बंदीबाबत जनजागृती करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
पशुहत्या बंदीबाबत मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठाचा निकाल व राज्य शासनाचा कायदा आहे. वरखेड यात्रेत पशुहत्या झाल्यास न्यायालयाचा अवमान व पशुहत्या बंदी कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल अंधश्रद्धा निर्मूलन समिती, मंदिर विश्वस्त मंडळाविरुद्ध कायदेशीर कारवाई करीन.
-कॉ. बाबा आरगडे, सल्लागार, अंधश्रध्दा निर्मूलन समिती .