टोमॅटोच्या शेतात चरण्यासाठी सोडली जनावरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:17 AM2021-01-17T04:17:51+5:302021-01-17T04:17:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क घारगाव : गत महिनाभरापासून टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. टोमॅटो ...

Animals left to graze in tomato fields | टोमॅटोच्या शेतात चरण्यासाठी सोडली जनावरे

टोमॅटोच्या शेतात चरण्यासाठी सोडली जनावरे

लोकमत न्यूज नेटवर्क

घारगाव : गत महिनाभरापासून टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. टोमॅटो उत्पादनासाठी लाखो रुपये खर्च करूनही उत्पन्न मिळत नसल्याने, संगमनेर तालुक्यातील पठार भागातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अनेकांनी आपल्या टोमॅटो पिकविलेल्या शेतात जनावरे चरण्यासाठी सोडली, तर काहींनी टोमॅटो तोडून जनावरांना खाण्यासाठी टाकले आहेत.

शाश्वत उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून टोमॅटोकडे पाहिले जाते. संगमनेर तालुक्यात पिकविलेल्या टोमॅटोला परराज्यात मोठी मागणी आहे. परराज्यांतील व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन टोमॅटोची खरेदी करतात. मात्र, सध्या तशी परिस्थिती नसून टोमॅटो बाजारात विक्रीला न्यायलाही परवडत नाही. उत्पादनासाठी मोठा खर्च करून, कष्ट घेऊन पिकविलेला मालविक्रीसाठी नेल्यावर मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनाचे पैसे खिशातून घालण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. टोमॅटो पिकासाठी एकरी एक ते सव्वालाख रुपये खर्च करून हातात एक रुपयाही पडत नाही.

शेतीची मशागत, ठिबक, मल्चिंग पेपर, खत, औषध, मंडपासाठी तार, बांबू, सुतळी, बांधणी, तोडणी (काढणी) मजुरी यासाठी मोठा खर्च होतो. माल परिपक्व झाल्यावर तो बाजारात आणण्यासाठी तोडणी, क्रेटभरणे, वाहतूक यासाठीही खर्च होतो. त्यामुळे उत्पादनासाठी आलेला खर्च व उत्पादनानंतर येणारा खर्च यांची गोळाबेरीज केली, तर आजच्या भावात उत्पादक शेतकऱ्यास टोमॅटो पीक नाहीत.

बाजारभाव वाढतील, अशा आशेवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. मात्र, बाजारात टोमॅटोला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटोच्या पिकात जनावरे चरण्यासाठी सोडली आहेत. टोमॅटोचे उत्पादन अधिक असल्याने मालाला बाजारात फारशी मागणी नाही. त्यामुळे शंभर रुपये प्रति कॅरेटला भाव मिळतो. चांगल्या मालाला तीन ते पाच रुपये किलो भाव मिळतो.

.....

चांगला दर मिळेल, या आशेवर एक एकर क्षेत्रात टोमॅटोची लागवड केली. मात्र, गेल्या महिन्यापासून टोमॅटो २ ते ३ रुपये किलो अशा कवडीमोल दरामुळे खर्चही निघत नाही. लाखो रुपये खर्च करून, उभे पीक सोडून देण्याची वेळ आली आहे. टोमॅटो तोडून मेंढ्यांना खाण्यास टाकले आहेत.

‌-रामनाथ कजबे, शेतकरी, खंदरमाळ, ता.संगमनेर.

.....

--------------

फोटो नेम : १६०१२०२० टोमॅटो, संगमनेर (मेलवर)

ओळ : टोमॅटोला भाव मिळत नसल्याने, टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी टोमॅटो तोडून जनावरांना खाण्यासाठी टाकले आहेत.

Web Title: Animals left to graze in tomato fields

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.