जिल्हाधिकारी कार्यालयावर सोडली जनावरे : शेतकरी संघटनेची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 07:47 PM2018-06-01T19:47:03+5:302018-06-01T19:47:17+5:30
दूधउत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर २७ रूपये हमीभाव द्यावा, तसेच दूध ग्राहकांना भेसळमुक्त दूध मिळावे, या मागणीसाठी शेतक-यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भाकड जनावरे नेत अनोखे आंदोलन केले. दूधदरवाढ करा नाहीतर जनावरांची व्यवस्था शासनाने करावी, अशा घोषणा शेतक-यांनी दिल्या.
अहमदनगर : दूधउत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर २७ रूपये हमीभाव द्यावा, तसेच दूध ग्राहकांना भेसळमुक्त दूध मिळावे, या मागणीसाठी शेतक-यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भाकड जनावरे नेत अनोखे आंदोलन केले. दूधदरवाढ करा नाहीतर जनावरांची व्यवस्था शासनाने करावी, अशा घोषणा शेतक-यांनी दिल्या.
भुमिपूत्र शेतकरी संघटना व पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. शेतीमालाला व दूधाला हमीभाव मिळत नसल्याने भाकड जनावरे सांभाळणे कठिण होत आहे. राज्यातील शेतक-यांना उत्पादक खर्चाशी निगडीत दुधाला प्रति लिटर २७ रूपये भाव मिळणे गरजेचे असताना केवळ १७ रूपयांचा भाव मिळतो. दूध संकलन करणारे संघ किंवा कंपन्या भेसळ करुन एका टँकरचे तीन टँकर करुन ग्राहकांना विकतात. यामुळे ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. यातून राज्यात दूध माफिया तयार झाले आहेत. या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणा-या दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांची भेसळयुक्त दुधाने त्यांच्या प्रतिकात्मक दगडाची तुला यावेळी करण्यात आली. शेतक-यांची संपूर्ण कर्जमाफी होवून, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची मागणी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचित यांना देण्यात आले.
आंदोलनात भुमिपूत्र शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष वाडेकर, पीपल्स हेल्पलाईनचे अॅड. कारभारी गवळी, शाहीर कान्हू सुंबे, राज्य प्रवक्ते अनिल देठे, संतोष कोरडे, रोहन आंधळे, संतोष हंडे, दिलीप कोकाटे, संजय भोर, गणेश सुपेकर, निलेश औटी, सुनीता चव्हाण, सुनील खोडदे, निलेश तळेकर, विश्वनाथ औताडे, सचिन ईरोळे, मंजाबापू वाडेकर, व्ही. के. खाडे, काशिनाथ गोके, निलेश भोर, बाळासाहेब दरेकर आदींसह शेतकरी सहभागी झाले होते.
नगर तहसीलवरही आंदोलन
प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने नगर तहसील कार्यालयावरही हे आंदोलन करण्यात आले. शेतक-यांनी यावेळी भाकड जनावरे व म्हातारे बैल आणले होते. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजय महाराज बारस्कर, जिल्हाध्यक्ष अॅड. लक्ष्मणराव पोकळे, कार्याध्यक्ष विनोदसिंग परदेशी, भाऊसाहेब मोढवे, विजय मस्के, बाबासाहेब महापुरे, बाहुबली वायकर आदींसह शेतकरी उपस्थित होते.
सरकारने कर्जमाफीच्या नावाखाली पद्धतशीरपणे शेतकºयांचे आंदोलन दडपले. त्यामुळे शेतक-यांच्या आत्महत्या वाढण्याची शक्यता आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले, असे बारस्कर महाराज म्हणाले.