Anna Hajare: ...अन्यथा सरकारमधून पायउतार व्हा, अण्णा हजारेंचा ठाकरे सरकारला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 05:59 PM2022-05-15T17:59:27+5:302022-05-15T17:59:51+5:30
ठाकरे सरकारच्या अगोदर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकायुक्त कायदा बनविण्याचं लेखी आश्वासन दिलं होतं
अहमदनगर - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा दिला आहे. लोकायुक्त कायद्याची मागणी करत अण्णांनी पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा इशारा राज्य सरकारला दिला. तसेच, एकतर कायदा करा अन्यथा सरकारमधून पायउतार व्हा, असे अण्णांनी म्हटले आहे. यापूर्वी राज्य सरकारकडून लोकायुक्त कायदा करण्यासंदर्भात लेखी आश्वासनाद्वारे फसवणूक झाल्याचं अण्णांनी म्हटलं. दरम्यान, यापूर्वी किराणा दुकानातून वाईन विक्रीच्या विरोधात अण्णांनी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता.
ठाकरे सरकारच्या अगोदर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकायुक्त कायदा बनविण्याचं लेखी आश्वासन दिलं होतं. त्यानंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तेच केलं. मात्र, अडीच वर्षे उलटून देखील त्यावर काहीच होत नसल्याची खंत अण्णा हजारे यांनी व्यक्त केली. लोकायुक्त कायद्याच्या अनुषंगाने सात बैठकाही पार पडल्या होत्या. आता दोन वर्ष उलटून गेल्यानंतरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर काहीही बोलण्यास तयार नाहीत, असे अण्णांनी म्हटले. तसेच, राज्यातील 35 जिल्ह्यात आमच्या समित्या तयार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यावरही अण्णांनी नाराजी व्यक्त केली. अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाची दोन राज्यात सत्ता आली. पण, अद्यापही त्या राज्यात लोकायुक्त कायदा तयार करण्यात आला नाही, याचे दु:ख वाटत असल्याचेही अण्णा हजारे यांनी म्हटले.
वाईन विक्रीवरुनही दिला होता उपोषणाचा इशारा
राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार सुपरमार्केट आणि किराणा दुकानांमधून वाईन विक्री सुरू करणे महाराष्ट्रासाठी अतिशय दुर्दैवी आहे. केवळ राज्याचा वाढणारा महसूल आणि वाईन उत्पादक तसेच विक्रेत्यांचे हित पाहून हा निर्णय घेतल्याचा आरोप करत अण्णांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. तसेच, वाईन विक्रीसंबंधी घेतलेल्या चुकीच्या धोरणाविरोधात आमरण उपोषण केले जाणार असल्याचं अण्णांनी फेब्रुवारी महिन्यात म्हटलं होतं. विशेष म्हणजे अण्णांच्या या उपोषणात नवनीत राणा यांनीही सहभागी होण्याची इच्छा बोलून दाखवली होत.