दारुबंदीच्या सुधारित मसुद्याबाबत अण्णा हजारे-बावनकुळे यांच्यात चर्चा
By Admin | Published: April 19, 2017 01:53 PM2017-04-19T13:53:47+5:302017-04-19T13:53:47+5:30
राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी दुपारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली़
आॅनलाइन लोकमत
राळेगणसिद्धी (अहमदनगर) दि़१९- उर्जा व राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी दुपारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली़ या दोघांमध्ये तब्बल दीड तास बंद खोलीत चर्चा सुरु होती़ चर्चेचा अधिकृत तपशील समजू शकला नाही़ मात्र, दारुबंदीच्या सुधारित मसुद्याबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात येते़
बुधवारी सकाळी ११़३० वाजता महावितरणचे वरिष्ठ अधिकारी राळेगणसिद्धीत दाखल झाले़ त्यांनी अण्णा हजारे यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली़ त्यानंतर १ वाजण्याच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क मंत्री बावनकुळे राळेगणसिद्धी येथे दाखल झाले़ त्यानंतर १२ वाजता त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या कार्यालयात भेट घेऊन अण्णांशी विविध विषयांवर चर्चा केली़ यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, पारनेरच्या तहसीलदार भारती सागरे आदी उपस्थित होते़ हजारे-बावनकुळे यांच्यातील चर्चा बंद खोलीत सुरु होती़ तेथे पत्रकार किंवा अन्य कोणत्याही पदाधिकाऱ्यांना जाण्यास मज्जाव करण्यात आला होता़ त्यामुळे चर्चेचा सविस्तर तपशील मिळू शकला नाही़ मात्र, दोघांमध्ये दारुबंदीच्या सुधारित मसुद्याबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येते़
पांगरमल दारुकांडाबाबत बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांची हजारे यांच्यासमोरच झाडाझडती घेतली़ अण्णा हजारे यांनीही या तपासाबाबत नाराजी व्यक्त करीत सरकारी कार्यालयातच बनावट दारु तयार केली जात असूनही अधिकाऱ्यांनी माहिती नव्हती का, असा सवाल उपस्थित केला़