अण्णा हजारे यांच्या हत्येची धमकी; व्हिडीओ केला प्रसारित, पोलिस तपास सुरू
By शिवाजी पवार | Published: April 12, 2023 03:58 PM2023-04-12T15:58:12+5:302023-04-12T15:58:33+5:30
श्रीरामपुरातील माथेफिरू
शिवाजी पवार, लोकमत न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर (जि.अहमदनगर) : श्रीरामपूर तालुक्यातील निपाणीवाडगाव येथील एका शेतकऱ्याने शेतीच्या वादातून अन्याय झाल्याचे कारण देत थेट समाजसेवक अण्णा हजारे यांची १ मेला हत्या करण्याची धमकी दिली आहे. पोलिसांनी या प्रकाराची दखल घेत चौकशी सुरू केली आहे. समाजमाध्यमात व्हिडीओ व्हायरल करत गायधने यांनी बुधवारी ही धमकी दिली. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी याबाबत विचारले असता या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती त्यांनी लोकमतला दिली.
व्हिडीओमध्ये गायधने यांनी शेतीच्या वारस नोंदीमध्ये अन्याय झाल्याचे म्हटले आहे. शेतीच्या गटामधील ९६ जणांनी एकत्रित येऊन आपल्याविरूद्ध कट करत आत्महत्या करण्याची वेळ आणली. त्यापूर्वी आपल्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न झाला.
आपल्यावरील अन्यायाची कैफियत तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे भेट घेऊन केली होती. त्यांनी त्यावेळी जिल्हा पोलिस प्रमुखांना चौकशीचे आदेश दिले होते. मात्र त्यात कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे आपण हतबल झालो आहे. संपूर्ण कुटुंबावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. तत्कालीन तहसीलदार सुभाष दळवी, निपाणीवाडगावचे पोलिस पाटील, तंटामुक्ती समितीचे प्रमुख हे आपल्यावरील अन्यायाला सर्वस्वी जबाबदार आहेत, असे गायधने यांचे म्हणणे आहे.
गेल्या तीन वर्षांपासून प्रशासनाकडे अन्यायाविरूद्ध न्यायाची मागणी करत आहे. कुटुंबासह समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेतली होती. त्यांना झालेल्या अन्यायाची सर्व माहिती दिली. मात्र अण्णा हजारे यांनीही दखल घेतली नाही. त्यामुळे त्यांची आपण १ मे रोजी हत्या करू शकतो, अशी धमकी गायधने यांनी दिली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"