पंतप्रधान झाल्यावर भ्रष्टाचारमुक्त-दारुमुक्त भारत घडवणार, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची ‘लोकमत’च्या बालचमूला विशेष मुलाखत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2017 07:48 PM2017-11-13T19:48:31+5:302017-11-14T07:54:43+5:30

अण्णा तुम्ही जर पंतप्रधान झाले तर पहिल्यांदा काय करणार, असा प्रश्न ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना एका चिमुकलीने विचारला.

Anna Hazare's Special Interview with Lokmak | पंतप्रधान झाल्यावर भ्रष्टाचारमुक्त-दारुमुक्त भारत घडवणार, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची ‘लोकमत’च्या बालचमूला विशेष मुलाखत

पंतप्रधान झाल्यावर भ्रष्टाचारमुक्त-दारुमुक्त भारत घडवणार, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची ‘लोकमत’च्या बालचमूला विशेष मुलाखत

अहमदनगर : अण्णा तुम्ही जर पंतप्रधान झाले तर पहिल्यांदा काय करणार, असा प्रश्न ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना एका चिमुकलीने विचारला. त्यावर अण्णांनाही हसू फुटले आणि ते म्हणाले, एक तर मी पंतप्रधान होणार नाही़ फकीर माणूस पंतप्रधान कसा होईल. जर झालोच पंतप्रधान तर पहिल्यांदा मी भारत भ्रष्टाचारमुक्त करीन. बालदिनानिमित्त ‘लोकमत’ने शालेय विद्यार्थ्यांना एक दिवसाचे पत्रकार बनण्याची संधी दिली़ ‘लोकमत’चे भावी महापत्रकार या उपक्रमात जिल्हाभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. त्यातील निवडक तरुणांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची मुलाखत विविध प्रश्नांवर अण्णांना बोलते केले़ अण्णांनी या चिमुकल्या पत्रकारांचा आदर राखीत सर्व प्रश्नांची मनमोकळी उत्तरे दिली.

एका मुलीने अण्णांना थेट पंतप्रधान झाल्यावर तुम्ही काय करणार, असा सवाल केला. त्यावर अण्णा हजारे म्हणाले, जर मी पंतप्रधान झालोच तर भारत भ्रष्टाचारमुक्त करण्याचा पहिला निर्णय घेईल. दुसरा निर्णय दारु बंदीचा घेईन. पण एकाही पुढा-याला हे आवडणार नाही़
त्यानंतर अण्णा हजारे यांनी एक-एका प्रश्नाचे उत्तर देत त्यांच्या लहानपणापासून ते सैन्यातील जीवन आणि त्यानंतरचे सामाजिक जीवन असा सारा पट या विद्यार्थ्यांसमोर उलगडला.

प्रश्न- अण्णा, तुमचे बालपण कसे गेले?
अण्णा- मी एका गरीब कुटुंबात जन्माला आलो. सुरवातीला कुटुंबाची परिस्थिती चांगली होती. पुढे पुढे आई-वडिलांनी फॅमिली प्लॅनिंगचा विचार केला नाही. कुटुंबातील संख्या वाढत गेली आणि आवक कमी होत गेली. घरातील आर्थिक परिस्थिती खालावली. लहान वयात खेळायचा शौक होता. विटीदांडू, हुतूतू, कबड्डी असे खेळ खेळायचो. शाळेतून आल्यानंतर दप्तर घरात ठेवले की खेळायला जायचो. अभ्यासापेक्षा खेळण्याकडे जास्त लक्ष असायचे. असे असले तरी वर्गात पहिला नंबर यायचा. बुद्धिमत्ता चांगली होती.

बालपणी कोणत्या व्यक्तींचा प्रभाव राहिला?
अण्णा- आईचे संस्कार होते. स्वामी विवेकानंद यांचा मोठा प्रभाव राहिला. मनुष्य जीवन कशासाठी आहे, याचा एकदा विचार करीत होतो. लोकं पळत आहेत. आणखी थोड... आणखी थोडं... असे पळतच राहतात. चौघांच्या खांद्यावर जाईपर्यंत थांबत नाहीत. जन्माला येताना काही आणत नाही आणि जाताना काही नेत नाही. तरीही तो पळतो का? याचे उत्तर मिळाले नाही म्हणून आत्महत्या करण्यासाठी निघालो. मात्र स्वामी विवेकानंद यांचे पुस्तक हाती पडले आणि जीवन कळाले. जीवनात एकदाच खोटे बोललो, याला मी आयुष्यात विसरलेलो नाही. आईचं मन मुलांनी जपलं पाहिजे. कबुतरं पाळण्याचा छंद होता. कुठेतरी त्यांना दूर सोडायचो. पतंग उडवायचो. दुसºयांचे पतंग कापले की आनंद व्हायचा. मांजा तयार करायचो. सोड्याच्या बाटल्या कुटून चांगला मांजा तयार करायचो आणि दुसºयाचे पतंग कापायचो. अशा अनेक बालपणीच्या आठवणी आहेत.

प्रश्न- सैन्यातील अनुभव कसे होते?
उत्तर- १९६३ मध्ये लष्करात भरती सुरू झाली, त्यात मी एक होतो. औरंगाबादला प्रशिक्षण झाले. सुरक्षेसाठी देशाच्या विविध भागात काम केले. देशाच्या रक्षणासाठी हिमालयात राहिलो. सात वर्षे बर्फात राहिलो. १९६५ ला भारत-पाकिस्तानचे युद्ध झाले. आमच्यावर हवाई हल्ले झाले. माझे सर्व सहकारी शहीद झाले, मी एकटा वाचलो. पुनर्जन्म झाला. नवीन जन्म झाल्याने देशाची सेवा करण्याचा निर्णय घेतला.

प्रश्न-उपोषण कसे जमते? झोपडपट्टीतील मुलांसाठी सरकारने काय केले पाहिजे?
अण्णा- शरीराला सवय लावली पाहिजे. दिवसातून चार वेळा जेवणाराला उपोषण जमणार नाही. इंद्रियांना जशी सवय लावाल, तसे वळतात. १६-१६ दिवस सोळावेळा उपोषणे झाली. आताही दिल्लीत फेब्रुवारीत उपोषण आहे.
शिक्षण हा प्रत्येक माणसाचा मूलभूत हक्क आहे. सरकार मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवत असेल तर अशा सरकारविरुद्ध दावा ठोकला पाहिजे. कोणी हक्क मोडीत काढत असेल तर त्यांच्याविरुद्ध लढा दिला पाहिजे.

Web Title: Anna Hazare's Special Interview with Lokmak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.