शिंदे सेनेकडून संगमनेरमधून अमोल खताळ, नेवासातून विठ्ठल लंघे, श्रीरामपूरमधून भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी
By अण्णा नवथर | Published: October 29, 2024 12:29 AM2024-10-29T00:29:17+5:302024-10-29T00:29:59+5:30
श्रीरामपूर मतदारसंघातील आमदार लहू कानडे यांनी सोमवारी सकाळी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. त्यांनाच उमेदवारी मिळणार, असे बोलले जात होते.
अहिल्यानगर: शिवसेनेकडून (शिंदे गट) श्रीरामपूरमधून भाऊसाहेब कांबळे, संगमनेरमधून अमोल खताळ, नेवासा मतदारसंघातून भाजपाचे विठ्ठल लंघे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
श्रीरामपूर मतदारसंघातील आमदार लहू कानडे यांनी सोमवारी सकाळी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. त्यांनाच उमेदवारी मिळणार, असे बोलले जात होते. मात्र ही जागा शिंदेसेनेला मिळाली असून, शिंदे सेनेने भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. संगमनेर मतदारसंघातून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील हे इच्छुक होते. त्यांनी संगमनेरमध्ये सभा घेत प्रचारही सुरू केला होता. मात्र ही जागाही शिंदे सेनेने घेतली असून, शिंदे सेनेने अमोल खताळ यांना उमेदवारी जाहीर केली आहे. नेवासा मतदारसंघाचाही तिढा सुटला आहे. नेवासा मतदार संघातून शिंदे सेनेकडून भाजपचे उत्तर जिल्हाध्यक्ष माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठल लंघे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. या मतदारसंघातून भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे हेही इच्छुक होते.