समन्वय समितीच्या बैठकीत अण्णांच्या आंदोलनाची रणनीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 12:35 PM2018-03-11T12:35:30+5:302018-03-11T12:37:06+5:30

लोकपाल, शेतक-यांचे प्रश्न व निवडणूक सुधारणा आदी मागण्यांबाबत नवी दिल्ली येथे २३ मार्चपासून सुरू होणा-या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सत्याग्रह आंदोलनाची रणनीती आखण्यासाठी राष्ट्रीय समन्वय समितीची पहिली बैठक शनिवारी नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात पार पडली

Anna's movement strategy in Coordination Committee meeting | समन्वय समितीच्या बैठकीत अण्णांच्या आंदोलनाची रणनीती

समन्वय समितीच्या बैठकीत अण्णांच्या आंदोलनाची रणनीती

राळेगणसिद्धी : लोकपाल, शेतक-यांचे प्रश्न व निवडणूक सुधारणा आदी मागण्यांबाबत नवी दिल्ली येथे २३ मार्चपासून सुरू होणा-या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सत्याग्रह आंदोलनाची रणनीती आखण्यासाठी राष्ट्रीय समन्वय समितीची पहिली बैठक शनिवारी नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात पार पडली. आंदोलनाची तयारी गतिमान करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
बैठकीत मार्गदर्शन करताना अण्णा म्हणाले, माझे जीवन आता जास्त नाही. जे जीवन मी जगत आहे, ते बोनस असून जोपर्यंत प्राण आहे, तोपर्यंत समाज व देशासाठी जीवन जगण्याचा माझा निर्धार आहे. भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन संघटनेसाठी चारित्र्यशील लोकांचे संघटन आवश्यक आहे. भविष्यात आंदोलन कायमस्वरूपी राहण्यासाठी राज्य, जिल्हा, तालुका स्तरावर चारित्र्यशील लोकांचे संघटन तयार झाले तर कोणतेही सरकार असो नाक दाबले की त्यांचे तोंड उघडेल. सरकारवर एक दबाव गट असायला हवा. आंदोलन चारित्र्यावर आधारित हवे. फक्त गर्दी जमवून काही होणार नाही. कार्यकर्त्यांनी ध्येयवादी असायला हवे. समन्वय समितीच्या सदस्यांनी आपापल्या राज्यात, जिल्हा व तालुक्यात भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाच्या शाखा तयार कराव्यात. परंतु, आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर करणे गरजेचे आहे. आंदोलनासाठी दानशूर व्यक्तींकडून मदत घ्या. परंतु, ती रोख स्वरूपात नको.
नवी दिल्लीतील आंदोलनासाठी कर्नल नैन, कमांडर यशवंत, मनिंद्र जैन यांनी आंदोलनाची जागा व प्रशासकीय बाबींची, प्रचार-प्रसार मटेरिअल डिझायनिंगची जबाबदारी सुनील लाल, आंदोलकांसाठी भोजन व्यवस्था करनवीर व सुनील फौजी यांनी स्वकारली आहे. बैठकीस डॉ. राकेश रफिक (वाराणसी ), अक्षय कुमार (ओडिशा), विनायक पाटील, कल्पना इनामदार, शिवाजी खेडकर (महाराष्ट्र), कमांडर यशवंत, कर्नल नैन (दिल्ली), सुशील भट्ट, भोपाल सिंह चौधरी (उत्तराखंड), गौरवकांत शर्मा, प्रताप चंद्रा, सुनील लाल, के. पी. एन. कल्कि ( उत्तर प्रदेश), राम नाईक ( कर्नाटक), दशरथ कुमार (राजस्थान), करनवीर थामन ( पंजाब ) आदींसह २४ सदस्य उपस्थित होते.

सोशल मीडियाला सूचना

इलेक्ट्रॉनिक मीडियाने नवी दिल्ली येथे होणाºया आंदोलनाच्या जनजागृतीकडे दुर्लक्ष केले आहे. कारण त्यांच्यावर केंद्र सरकारचा दबाव असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोशल मीडियावर जास्तीत जास्त प्रचार-प्रसार करण्याच्या सूचना अण्णा हजारे यांनी दिल्या.

 

Web Title: Anna's movement strategy in Coordination Committee meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.