अण्णांच्या राळेगणसिद्धीत मतदारांना साड्यांचे आमिष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:23 AM2021-01-16T04:23:37+5:302021-01-16T04:23:37+5:30

पारनेर (जि. अहमदनगर) : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आदर्श गाव असलेल्या राळेगणसिद्धीत मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी साड्या वाटप केल्याचा ...

Anna's Ralegan Siddhi lures voters with sarees | अण्णांच्या राळेगणसिद्धीत मतदारांना साड्यांचे आमिष

अण्णांच्या राळेगणसिद्धीत मतदारांना साड्यांचे आमिष

पारनेर (जि. अहमदनगर) : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आदर्श गाव असलेल्या राळेगणसिद्धीत मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी साड्या वाटप केल्याचा प्रकार घडला आहे. या साड्या वाटप करताना निवडणूक प्रशासनाच्या भरारी पथकाने चार जणांना पकडले. या प्रकाराबाबत आचारसंहिता भंग झाल्याची तक्रार गुरुवारी सायंकाळी पारनेर पोलिसांत दाखल झाली आहे.

राळेगणसिद्धी ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांना आमिष दाखविण्यासाठी साड्या वाटप करण्यात आल्या आहेत.

राळेगणसिद्धीचे माजी सरपंच जयसिंग मापारी, सुरेश पठारे, लाभेश औटी यांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, त्यांच्या विरोधात किसन पठारे व इतर निवडणूक लढवत आहेत.

राळेगणसिद्धीत साड्या वाटप होत असल्याची तक्रार भरारी पथकाचे प्रमुख तथा गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे यांच्याकडे आली होती. त्यानुसार गुरुवारी सायंकाळी बुगे यांचे पथक राळेगणसिद्धीत दाखल झाले. तेथे निवडणूक लढविणारे उमेदवार किसन मारुती पठारे, शकुंतला सुभाष औटी, विजया अशोक पठारे व त्यांचे कार्यकर्ते सुरेश दगडू पठारे, असे चौघे जण साड्या वाटप करताना आढळून आले. पथकाने त्यांच्या विरोधात पारनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

वाटप होत असलेल्या साड्या श्री. श्याम बाबा ग्रामविकास मंडळाच्या असल्याचे सांगण्यात आले. या मंडळाच्या उमेदवार शकुंतला सुभाष औटी व विजया अशोक पठारे यांच्याकडून वाटप केले जात होते. मतदारांनी मतदान करावे, यासाठी आमिष म्हणून वाटप करण्यासाठी आणलेल्या १३६ साड्या एका कारमध्ये आढळून आल्या, असे भरारी पथकाने तक्रारीत म्हटले आहे.

--------------

राळेगणसिद्धी येथे ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांना आमिष म्हणून साड्या वाटप करताना गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे यांच्या पथकाने चार जणांना पकडले आहे. त्यांच्या विरोधात पारनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. शुक्रवारी (दि.१५) न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल.

-घनश्याम बळप, पोलीस निरीक्षक, पारनेर

Web Title: Anna's Ralegan Siddhi lures voters with sarees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.