मदतीची घोषणा वाऱ्यावरच; कधी मिळणार रिक्षाचालकांना दीड हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:21 AM2021-05-08T04:21:12+5:302021-05-08T04:21:12+5:30
कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध जारी केले आहेत. अत्यावश्यक सेवावगळता इतर व्यवहार बंद आहेत. या काळात ...
कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध जारी केले आहेत. अत्यावश्यक सेवावगळता इतर व्यवहार बंद आहेत. या काळात दुर्बल घटकांना शासनाने मदतीची घोषणा केली असून, परवानाधारक रिक्षाचालकांनाही प्रत्येकी दीड हजार रुपये देण्याचे जाहीर केले आहे. मदत जाहीर करून पंधरा दिवस उलटून गेले असले तरी रिक्षाचालकांना अद्यापपर्यंत ही मदत मिळालेली नाही. जिल्ह्यात नऊ हजार ६०६ परवानाधारक रिक्षाचालक आहेत. सध्या लॉकडाऊनमुळे प्रवासी नसल्याने अनेक रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे अशा अडचणीच्या काळात शासनाने जाहीर केलेली मदत तत्काळ मिळावी, अशी मागणी रिक्षाचालकांमधून होत आहे. तसेच शासनाने ही मदत तातडीने द्यावी, यासाठी रिक्षाचालक संघटनेचा प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.
.......
शासनाने रिक्षाचालकांना मदत जाहीर केली असली तरीही अद्यापपर्यंत लाभ मिळालेला नाही. तसेच जाहीर केलेले प्रत्येकी दीड हजार रुपये ही तुटपुंजी मदत आहे. रिक्षाचालकांना प्रत्येकी किमान दहा हजार रुपयाची मदत द्यावी, अशी मागणी आम्ही संघटनेच्या वतीने शासनाकडे केली आहे. या मागणीची दखल घेऊन शासनाने तातडीने रिक्षाचालकांच्या खात्यात मदतीची रक्कम वर्ग करावी.
अविनाश घुले, अध्यक्ष, रिक्षाचालक संघटना
.......
शासनाने मदत जाहीर केली, मात्र अद्यापपर्यंत कुणालाच मदत मिळालेली नाही. सध्या प्रवाशांअभावी रिक्षा बंद असल्याने आता खरी मदतीची गरज आहे.
-हरीश डोळसे, रिक्षाचालक
.........
मदतीचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याचे सांगण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र अर्जाची वेबसाइट ओपन होत नाही. त्यामुळे जाहीर केलेली मदत कधी मिळणार असा प्रश्न आहे.
-अंबादास महालकर, रिक्षाचालक
...........
लॉकडाऊनमुळे रिक्षाचालक सध्या घरीच बसून आहेत. शासनाने मदत जाहीर केली मात्र तिचा लाभ अद्यापपर्यंत मिळालेला नाही. ही मदत तातडीने द्यावी.
- अकबर शेख, रिक्षाचालक
...........
जिल्ह्यात परवानाधारक रिक्षाचालकांची संख्या- ९ हजार ६०६