जिल्ह्याला आणखी ५४ हजार लसीचे डोस उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:19 AM2021-04-13T04:19:45+5:302021-04-13T04:19:45+5:30
नगर जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाची मोहीम सुरू झालेली आहे. आतापर्यंत जिल्ह्याला ३ लाख १२ हजार १५० डोस उपलब्ध ...
नगर जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाची मोहीम सुरू झालेली आहे. आतापर्यंत जिल्ह्याला ३ लाख १२ हजार १५० डोस उपलब्ध झाले होते. हे सर्व डोस जिल्हाभर संबंधित लसीकरण केंद्रांना जिल्हा परिषदेकडून देण्यात आले आहेत. तरीही तीन दिवसांपूर्वी काही केंद्रांवर लसीचा तुटवडा जाणवला होता. नगर जिल्ह्यात तीनच दिवस पुरेल एवढी लस शिल्लक होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूटकडे लसीची मागणी करण्यात आली. त्यानुसार सोमवारी ५४ हजार ७०० डोस उपलब्ध करून देण्यात आले. सोमवारी दुपारी जिल्हा परिषदेला हे डोस मिळाले. त्यानंतर तातडीने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने खासगी तसेच शासकीय लसीकरण केंद्रांना या लसीचे वितरण केले. त्यामुळे मंगळवारपासून पुन्हा लसीकरण मोहीम सुरळीत होणार आहे.
-------------
सोमवारी अनेक केंद्र बंद
रविवारपर्यंत जिल्ह्यातील अनेक लसीकरण केंद्रांमधील लस संपलेली होती. त्यामुळे खासगी रुग्णालयांतील केंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र येथील लसीकरण सोमवारी बंद होते. सोमवारी केवळ ग्रामीण रुग्णालयांमध्ये काही ठिकाणी लसीकरण सुरू होते. परंतु आता लस उपलब्ध झाल्याने मंगळवारपासून पुन्हा लसीकरण सुरू होणार आहे.
----------------
जिल्ह्याला ३ लाख ६६ हजार डोस उपलब्ध
नगर जिल्ह्याला गेल्या तीन महिन्यात आतापर्यंत एकूण ३ लाख ६६ हजार ८५० लसीचे डोस उपलब्ध झाले आहेत. त्यातून २ लाख ९० हजार डोस नागरिकांना देण्यात आले आहेत.
----------------